Politics

काय म्हणतो गोपनीय अहवाल? …खरंच रोहित निकमांना उमेदवारी मिळणार का?

महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघ भाजपचा गड मानला जातो. गेल्या दोन्ही पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. जळगाव लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील आणि रावेर लोकसभा मतदार संघाच्या खा.रक्षाताई खडसे यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा शुक्रवारी जोरात सुरू झाली आहे. रावेरमध्ये इच्छुकांची फारशी गर्दी नसली तरी जळगावात मात्र अर्धा डझन उमेदवार तयारीत आहेत. जळगावात सध्या सुरू असलेल्या चर्चेत जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित निकम यांचे नाव वर येत असून त्यानंतर माजी खा.ए.टी.नाना पाटील, अविनाश पाटील-जाधव, माजी आ.स्मिताताई वाघ आणि सर्वात शेवटी विद्यमान खा.उन्मेष पाटील यांचे नाव येत आहे. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणांनी देखील रोहित निकम यांच्या बाबतीत सकारात्मक अहवाल दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपने ३०० पार तर मोदी सरकारने ४०० पारचे लक्ष ठेवले आहे. आपल्याकडे एकहाती सत्ता ठेवण्यासाठी भाजप सर्वच जागांवर दमदार उमेदवार देण्याच्या तयारीत असून काही जागांवरील उमेदवार बदलण्याची देखील तयारी आहे. भाजपकडून तीन स्तरांवर सर्व्हेक्षण करण्यात आले असून त्या आधारे उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. महाराष्ट्रात सध्या भाजपचे ट्रिपल इंजिन सरकार असून त्यामुळे जागा वाटपाचा तिढा देखील अद्याप सुटलेला नाही. मागील दोन्ही पंचवार्षिकमध्ये भाजपच्या पहिल्याच यादीत जळगावच्या उमेदवाराची घोषणा झाली होती मात्र यंदा पहिल्या यादीत महाराष्ट्राच्या एकही उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

जळगावात भाजपच्या ‘पंचक’ची चर्चा
जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपकडून सध्या ५ नावांची जोरदार चर्चा आहे. चर्चेत सध्या विद्यमान खा.उन्मेष पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित निकम, माजी आ.स्मिता वाघ, उद्योजक अविनाश पाटील – जाधव, माजी खा.ए.टी.नाना पाटील यांचे नाव येत आहे. विद्यापीठ सदस्य दिलीप पाटील यांच्या देखील नावाची चर्चा होती मात्र त्यांना अंतर्गत विरोध असल्याचे पत्र व्हायरल झाले होते. जळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपचे पारडे जड असल्याने इच्छुकांची देखील गर्दी वाढली आहे.

गुप्तचर यंत्रणा, थर्ड पार्टी अहवाल सकारात्मक
प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर चर्चेतील चेहऱ्यांची माहिती केंद्रीय यंत्रणेकडून मागवली जाते. गृह खात्याच्या गुप्तचर यंत्रणा म्हणजेच आयबी, सीआयडी, एसआयडी, पोलिसांच्या गोपनीय खात्याकडून इच्छुकांची सखोल माहिती मागविण्यात येते. जळगावातील रोहित निकम यांच्या बाबतीत देखील गुप्तचर यंत्रणांनी सकारात्मक अहवाल पाठवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच पक्षाकडून थर्ड पार्टी एजन्सीमार्फत केलेल्या सर्व्हेत देखील रोहित निकम यांच्या विजयाची संधी सर्वाधिक असल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षश्रेष्ठींच्या दालनात या अहवालाला विशेष महत्त्व असून त्यावर पुढील सूत्रे आणि निर्णय निश्चित असतात.

रोहित निकमच आघाडीवर का?
जळगाव लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे रिपोर्ट कार्ड सकारात्मक नसल्याचे म्हटले जाते. तसेच काही वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या यादीत देखील त्यांचा पत्ता कट होणार असल्याचे म्हटले जात आहे. जळगाव शहरात तर खासदारांना पहिलेच नाही अशी चर्चा सोशल मीडियावर होते आहे. माजी आ.स्मिता वाघ या पक्षाशी एकनिष्ठ असल्या तरी त्यांना पक्षाने बऱ्याच जबाबदाऱ्या दिल्या असून अनेक पदे त्यांनी व वाघ कुटुंबाने भूषवली आहेत. माजी खा.ए.टी.नाना पाटील हे मधल्या काळात भाजपच्या फारश्या संपर्कात नव्हते तसेच भाजपचा एक गट देखील त्यांच्या विरोधात आहे. उद्योजक अविनाश पाटील – जाधव हे मूळ जळगावकर असले तरी त्यांना जळगावकरच अद्याप ओळखत नाही. राम मंदिर महोत्सवपासून त्यांचे बॅनर झळकल्याने ते प्रकाशझोतात आले. रोहित निकम यांची जळगावशी घट्ट नाळ जुळली असून संपूर्ण परिवाराला जळगाव जिल्हाच नव्हे देश ओळखतो. युवा नेतृत्व आणि पक्षश्रेष्ठींच्या जवळचे असल्याने भविष्यात मतदारसंघाच्या विकासाला देखील निकमांच्या माध्यमातून चालना मिळू शकते.

वकील घराण्याची कौतुकास्पद परंपरा..
जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे संस्थापक माजी आमदार बॅरिस्टर देवराम निकम यांचे नातू व विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांचे पुतणे असलेल्या रोहित निकम यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रीय पातळीवर मोठा संदेश देता येणार आहे. विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्वल निकम यांचे राष्ट्रीय पातळीवरही मोठे नाव आहे शिवाय युवा कार्यकर्ता असलेल्या रोहित निकम यांचा दांडगा जनसंपर्कही आहे. सध्या जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक म्हणून रोहित दिलीप निकम हे काम पाहत आहे.

सहकाराशी निकम परिवाराचे घनिष्ठ नाते..
रोहित निकम हे जळगाव जिल्हा मार्केटींग फेडरेशनचचे संचालक, तसेच जिल्हा दूध संघाचे संचालक ‘कृभको’मुबंई चे सदस्य आहेत तसेच इतर सहकार संस्थावर ते सदस्य म्हणून कार्य करीत आहेत. त्यांच्या मातोश्री शैलजा दिलीप निकम या जिल्हा बँकेच्या संचालक आहेत तसेच माजी जिल्हा परीषद सदस्याही आहेत. वडिल दिलीप निकम हे प्रगतीशील शेतकरी असून तर काका अ‍ॅड.उज्वल निकम हे राज्याचे विशेष सरकारी वकिल आहेत. एवढेच नव्हे तर, रोहित निकम यांचे आजोबा बॅरिस्टर देवराम निकम यांच्या नावाला जळगाव जिल्ह्यात एक वेगळं सामाजिक आणि राजकीय वलय आहे.

निकम परिवार आणि सामाजिक हितसंबंध..
रोहित यांचे आजोबा बॅरिस्टर देवराम निकम हे चोपडा मतदार संघातून १९५५ ते १९५९ ला आमदार म्हणून निवडून आले होते त्यामुळे निकम परिवाराची नाळ अजूनही चोपडा तालुक्यात जुळून आहे. आजोबा, काका, आई आणि स्वतःचा सामाजिक संपर्क दांडगा असल्याने तो त्यांच्यासाठी प्लस पॉइंट मानला जातो. दुसरीकडे रोहित निकम यांचा मोठा काळ आणि रहिवास जळगाव शहरात असल्याने त्यांचा मित्रांचा आणि नातेवाईकांचा गोतावळा जिल्ह्यात विस्तारलेला आहे. मराठा समाजाचा एक तरुण, तडफदार आणि शांत स्वभावाचे असलेले रोहित निकम हे आयटी सेक्टरमध्ये काम करत असल्यामुळे त्यांचा थेट तरुणांशी संपर्क आहे. शिवाय भाजपच्या बुथ कमेटीवरही ते काम करीत असल्याने भाजपा पक्षश्रेष्ठींकडून पार्लमेंट्री बोर्डमध्ये रोहित निकम यांच्या नावाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे कळते.

रावेर लोकसभा मतदार संघात ‘नो कमेंट्स’
रावेरच्या विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांची उमेदवारी आजच्या तारखेत निश्चित मानली जात आहे. नुकतेच झालेल्या भाजपच्या युवा संमेलनात देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यासपीठावरून रक्षाताई खडसे यांचे नाव बहेन म्हणून पुकारले होते. एकनाथ खडसेंच्या चर्चेमुळे रक्षा खडसेंचा पत्ता कट झाल्यास या जागेवर माजी खासदार स्व.हरिभाऊ जावळे यांचे सुपूत्र अमोल जावळे यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता आहे. युवा नेतृत्व असलेले अमोल जावळे हे सध्या भाजपाचे पूर्व जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. रावेर मतदारसंघात त्यांनी गेल्या तीन वर्षात चांगला जनसंपर्क प्रस्थापित केला असून भाजप श्रेष्ठींशी देखील त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button