जळगावचा महापौर कोण होणार? : भाजपने ६, शिवसेनेने घेतले २ अर्ज

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहर महानगरपालिकेचा महापौर आणि उपमहापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजप आणि शिवसेनेने अद्यापपर्यंत सस्पेंस कायम ठेवला असून महापौर व उपमहापौरपदासाठी भाजपकडून प्रत्येकी ६ असे १२ अर्ज शुक्रवारी अंतिम दिवशी घेण्यात आले आहे. तर सेनेकडूनही महापौर पदासाठी २, उप महापौर पदासाठी २ असे ४ अर्ज घेण्यात आले.
नुकतेच पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीने दमदार यश संपादन केले आहे. जळगावात भाजपने ४६ तर शिवसेना शिंदे गटाने २२ जागांवर यश मिळविले. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट १ व अपक्ष १ असे मिळून आता महायुतीचे संख्याबळ ७० झाले आहे. त्यामुळे महापौर हा भाजपचा व उप महापौर हे शिवसेनेचा होणार हे सूत्र जवळपास निश्चित झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून महापौर व उपमहापौरसाठी एकही अर्ज घेण्यात आला नव्हता. मात्र अंतिम दिवशी शुक्रवारी दि. ३० रोजी भाजपचे शहर सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांच्यासह गटनेते प्रकाश बालाणी, उप गटनेते नितीन बरडे, प्रतोद डॉ. चंद्रशेखर पाटील हे मनपात दुपारी सव्वा बारा वाजता दाखल झाले.

नगर सचिव सतिश शुक्ला यांच्याकडून प्रकाश बालाणी यांनी महापौर पदासाठी ४ फॉर्म घेतले. नितीन बरडे यांनी उपमहापौर पदासाठी ४ फॉर्म घेतले. तर प्रतोद डॉ.चंद्रशेखर पाटील यांनी २ फॉर्म घेतले. याप्रकारे १० अर्ज महापौर पदासाठी घेण्यात आले. तर डॉ.चंद्रशेखर पाटील यांनी उपमहापौर पदासाठी देखील २ अर्ज घेतले. आम्ही महायुतीकडून १२ अर्ज घेतल्याची माहिती गटनेते, उप गटनेत्यांकडून देण्यात आली आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून चौथ्यांदा निवडून आलेले नगरसेवक मनोज सुरेश चौधरी हे महापालिकेत १२.३० ला दाखल झाले. त्यांनी महापौर पदासाठी २ तर उप महापौर पदासाठी २ अर्ज घेतले आहे. आता दि.२ फेब्रुवारी उमेदवारी अर्ज कोण भरते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.





