जळगाव शहर विधानसभेतून भाजपचा भावी दावेदार कोण?
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातील महत्त्वाचा आणि जिल्ह्याचे ठिकाण असलेला मतदार संघ म्हणजे जळगाव शहर विधानसभा मतदार संघात. महायुती आणि महाविकास आघाडीच्या फोडाफोडीत यंदा जळगावातून अनेक चेहरे इच्छुक असून त्यात कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जळगाव शहर विधानसभा मतदार संघात गेल्या १० वर्षापासून भाजपचे वर्चस्व राहिले आहे. जळगावात यापूर्वी अनेक वर्ष शिवसेना म्हणजेच सुरेशदादा जैन यांचे वर्चस्व राहिले आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत भाजपचे सुरेश भोळे यशस्वी झाले आणि सुरेशदादांच्या गडाला सुरुंग लागला. पुन्हा २०१९ च्या निवडणुकीत आ.भोळे यांनी राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांचा पराभव केला होता.
पुन्हा आ.सुरेश भोळे की इतर कुणी?
जळगाव शहराचे विद्यमान आमदार सुरेश (राजुमामा) भोळे यांचे नाव यंदा देखील कायम असल्याचे बोलले जात असले तरी इतर काही नावे आणखी चर्चेत आली आहेत. भाजपकडून रोहित निकम, माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, सुनील खडके, डॉ.केतकी पाटील यांच्यासह एका उद्योजकाचे नाव पुढे केले जात आहे. महायुती असल्याने तिन्ही पक्षाच्या नेत्यांची बाजू देखील महत्वाची ठरणार असल्याने आ.भोळे पुन्हा असणार की उमेदवार बदलणार याकडे लक्ष लागून आहे.
..तर कुणाचे नाव आघाडीवर
महायुतीत जळगाव शहरातून उमेदवार बदलायचं ठरल्यास रोहित निकम यांच्या नावाला अधिक पसंती असेल. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसली तरी पडद्यामागून बूथ व्यवस्थापन त्यांनी उत्कृष्टरित्या हाताळले, त्यामुळे विधानसभेच्या माध्यमातून त्यांना संधी दिली जाऊ शकते. माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे आणि सुनील खडके यांचे देखील नाव चर्चेत असून त्यांना भाजपातील सर्वांचा ग्रीन सिग्नल आवश्यक आहे. डॉ.केतकी पाटील यांनी नुकतेच प्रवेश केला असून त्या रावेरमधून इच्छुक आहेत. तसेच जळगाव शहर देखील त्यांच्यासाठी नवेच असल्याने त्यांना कितपत पसंती असते हा प्रश्नच आहे. एक उद्योजकाचे नाव पुढे येत असले तरी त्यांची शक्यता देखील सांगता येत नाही.