पिंपरखेड तलावात आणखी एक मृतदेह आढळला, दोन दिवसांत दुसरी घटना

महा पोलीस न्यूज । विजय माळी । पिंपरखेड येथील तलावात आज सकाळी आणखी एक मृतदेह तरंगताना आढळल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी याच तलावात २७ वर्षीय वाल्मीक संजय ह्याळींगे याचा मृतदेह सापडला होता. त्या घटनेचा तपास सुरू असतानाच पुन्हा एका व्यक्तीचा मृतदेह मिळाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारास तलावात एक अज्ञात व्यक्तीचे शरीर आढळले. नंतर त्याची ओळख नारायण रामदास ह्याळींगे (वय ५२) अशी पटली. घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमा झाली असून या दोन सलग मृत्यूंमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पहिल्या मृत्यूप्रकरणाची नोंद भडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून झाली होती. परंतु दुसरा मृतदेहही त्याच तलावात मिळाल्याने नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे. मृत नारायण ऱ्हाळीगे यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
घटनास्थळी संतप्त ग्रामस्थांनी एरंडोल–भडगाव महामार्गावर तीन तासांपर्यंत रास्ता रोको आंदोलन केले. त्यांनी इन-कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि पोलिस प्रशासनाला मोठी धावपळ करावी लागली.
दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, भडगावचे निरीक्षक महेश शर्मा, तसेच पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे, लक्ष्मी करनकाळ आणि शेखर डोमाळे यांनी घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांशी चर्चा केली. प्रशासनाने तातडीने तपास व आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सलग दोन दिवसांत एकाच तलावातून मृतदेह आढळल्याने गावकऱ्यांमध्ये घातपाताच्या शक्यतेबाबत चर्चेला ऊत आला आहे. स्थानिक नागरिकांनी दोन्ही मृत्यूंचा सखोल तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शेवटची माहिती मिळेपर्यंत भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.






