अवघ्या 12 तासात खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा !, एकाला अटक

अवघ्या 12 तासात खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा !, एकाला अटक
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
यवतमाळ (प्रतिनिधी) –बाभुळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या १२ तासांत अज्ञात आरोपीचा छडा लावत त्याला अटक केली. ही कारवाई पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे केली.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,
दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी सैयद नाजीम सैयद रऊफ (वय ४०, रा. मिटणापूर) हा बेबळा धरणाच्या कॅनॉलजवळ म्हशी चारण्यासाठी गेला होता. दुपारी तीनच्या सुमारास गेलेला नाजीम सायंकाळी पाच वाजता कॅनॉलजवळ जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तत्काळ उपचारासाठी बाभुळगावच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र नंतर यवतमाळच्या रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री १० वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्याच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून, मृतकाचा जुना शेजारी जाबीर मुल्ला याच्याशी पूर्वी म्हशीच्या कारणावरून वाद झाल्याचे समोर आले. या वादात नाजीमने जाबीरला मारहाण केली होती, त्यानंतर त्यांचे संबंध ताणले गेले होते. या माहितीच्या आधारे मृतकाच्या शेजारी असलेल्या जाबीर मुल्लाचा मुलगा युनूस मुल्ला याला ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीत युनूसने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार, पूर्वीच्या वादातून आणि वडिलांना झालेल्या मारहाणीचा राग मनात ठेवून त्याने नाजीमवर धारदार लोखंडी विळा आणि काठीने छाती, बगलेखाली व डोक्यावर वार करून त्याचा खून केला.
अवघ्या १२ तासांत गुन्हा उघडकीस आणून आरोपीस अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे आणि लहुजी तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. गजानन राजमल्लू, पोलीस अंमलदार साजिद, बंडू डांगे, रूपेश पाली, योगेश डगवार, आकाश सुर्यवंशी, देवेंद्र होले आणि योगेश टेकाम यांनी केली.