
यवतमाळ पोलीस दलाकडून २९ लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत
विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते सोने, चांदी आणि रोख रक्कम सुपूर्द; तक्रारदारांनी मानले आभार
यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडून विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र यांच्या हस्ते विविध पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यांतील सोने, चांदी आणि रोख रक्कम तक्रारदारांना परत करण्यात आली.
दि. २७ रोजी रामनाथ पोकळे, विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या वार्षिक तपासणी २०२४-२०२५ निमित्त भेट दिली. त्यांच्या हस्ते यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने विविध पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्यांच्या तपासात जप्त केलेला सोने, चांदी आणि रोख रक्कम यवतमाळ पोलीस मुख्यालयात तक्रारदारांना सुपूर्द केला. यावेळी कुमार चिंता, पोलीस अधीक्षक, यवतमाळ आणि पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमात पोलीस स्टेशन आर्णी, अवधूतवाडी, यवतमाळ शहर, पारवा, दिग्रस, कळंब आणि वणी येथील तक्रारदारांना त्यांचे चोरीस गेलेले सोने-चांदीचे दागिने (किंमत २५,३८,८७४ रुपये) आणि रोख रक्कम ४,०५,००० रुपये असा एकूण २९,४३,८७४ रुपये (एकोणतीस लाख त्रेचाळीस हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपये) परत करण्यात आले.
वणी पोलीस स्टेशन येथे तक्रारदार अक्षय प्रदीप चिंडालिया (वय ३०, रा. साधनकरवाडी) यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा (अप. क्र. ८३/२०२५, कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(३) BNS) दाखल करून तातडीने तपास करण्यात आला. या गुन्ह्यातील जप्त मुद्देमालात चार सोन्याच्या बांगड्या (वजन ५५.१७० ग्रॅम, किंमत ४,४१,३६० रुपये), एक सोन्याचे मंगळसूत्र (वजन २४.४२० ग्रॅम, किंमत १,९६,३६० रुपये), एक सोन्याचा हार (वजन १३.७५० ग्रॅम, किंमत १,१०,००० रुपये), सोन्याचे टॉप्स (वजन ९.७३० ग्रॅम, किंमत ७७,८४० रुपये), सोन्याची चैन (वजन १३.०१० ग्रॅम, किंमत १,०४,०८० रुपये), सोन्याच्या वेली (वजन ३.८६० ग्रॅम, किंमत ३०,८८० रुपये), सोन्याच्या बिया (वजन ४ ग्रॅम, किंमत १२,००० रुपये), झुमके (वजन २.०१० ग्रॅम, किंमत १६,१२० रुपये), सोन्याच्या बाळ्या (वजन ४.०३० ग्रॅम, किंमत ३२,४४० रुपये), स्टोन असलेली अंगठी (वजन ४.१८० ग्रॅम, किंमत ३३,४४० रुपये), स्टोन नसलेली अंगठी (वजन ३.४६० ग्रॅम, किंमत २७,६८० रुपये), पेंडल (वजन २.८०० ग्रॅम, किंमत २२,४०० रुपये), बास्केट टॉप्स (वजन १.०८० ग्रॅम, किंमत ८,६४० रुपये), पेच (वजन ०.७८० ग्रॅम, किंमत ६,२४० रुपये) आणि चांदीचे पायातील तोडे (वजन ४७.७६० ग्रॅम, किंमत ४,७७६ रुपये) असा एकूण ११,१९,४५६ रुपये किंमतीचा मुद्देमाल तक्रारदाराच्या स्वाधीन करण्यात आला.
रामनाथ पोकळे यांच्या हस्ते हा मुद्देमाल तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी त्यांनी पोलीस खात्याचे आभार मानले आणि तक्रारदारांनीही आपला आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, चोरीस गेलेला ऐवज परत मिळेल अशी आशा नव्हती, परंतु पोलीसांच्या कार्यक्षमतेमुळे हे शक्य झाले.