‘खाकी’तील माणुसकी! यवतमाळ पोलिसांकडून २७ लाखांचे भावनिक योगदान
पुरग्रस्तांसाठी पगारातून दिला निधी : मुख्यमंत्र्यांकडून विशेष कौतुक

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असताना, यवतमाळ पोलीस दलाने सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श उभा केला आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या एका भावनिक आवाहनाला प्रतिसाद देत, पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने आपले योगदान देत, तब्बल ₹ २७ लाख ११ हजार १११ रुपये एवढी मोठी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली.
मदतीचा धनादेश पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. ‘सेवा’ आणि ‘सुरक्षा’ यापलीकडे जाऊन पोलिसांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेला राज्यभरातून सलाम करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षकांचे भावनिक आवाहन ठरले प्रेरणास्रोत
पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून हा माणुसकीचा उपक्रम साकारला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांमध्ये पूरग्रस्तांच्या वेदनांची जाणीव निर्माण करत स्वेच्छेने योगदान देण्याचे कळकळीचे आवाहन केले. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, यवतमाळ पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारातून शक्य तेवढी मदत केली, ज्यामुळे ही विक्रमी रक्कम जमा झाली.
धुळे पोलिसांनीही दिला होता निधी
तत्पूर्वी धुळे जिल्ह्यातील ५० पोलीस अधिकाऱ्यांनी देखील ओल्या दुष्काळात आपल्या पगारातून २ लाख रुपये मुख्यमंत्री मदत निधीला देऊन माणुसकीचा ‘गुलाब’ दिला होता. आता यवतमाळ पोलिसांनी त्याहीपेक्षा मोठे योगदान देऊन, संकटाच्या काळात प्रशासन कसे एक कुटुंब म्हणून काम करते, हे दाखवून दिले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून ट्विटद्वारे मनःपूर्वक आभार
यवतमाळ पोलिसांच्या या अतुलनीय योगदानाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यांनी खास ट्विट (X) करत पोलीस दलाचे आभार मानले. “यवतमाळ पोलीस अधीक्षकांच्या पुढाकाराबद्दल आणि प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समाजोपयोगी मोलाच्या योगदानाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो.” अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या कौतुकाच्या शब्दांमुळे यवतमाळ पोलीस दलाचा सन्मान आणखी वाढला आहे.
पोलीस पुन्हा ठरले आदर्श
या भावनिक आणि मोलाच्या योगदानामुळे, यवतमाळ पोलीस केवळ गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणारे कठोर प्रशासन म्हणून नव्हे, तर संकटग्रस्त नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे करणारे संवेदनशील कुटुंब म्हणून महाराष्ट्राच्या स्मरणात राहतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट :
https://x.com/dev_fadnavis/status/1972676549624091003?s=46
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फेसबुक पोस्ट :
https://www.facebook.com/share/p/1FqT5hDLFf/?mibextid=wwXIfr






