जळगाव एलसीबी निरीक्षकांची नियुक्ती घाईत कि तात्पुरती?

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जिल्हा पोलीस प्रशासनातील महत्वाची खुर्ची समजली जाणारी एलसीबीची खुर्ची सध्या जास्तच चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यात जळगाव एलसीबी जरा जास्तच चर्चेत आहे. अवघ्या वर्षभरात दोन निरीक्षकांची बदली झाल्याने जिल्हा पोलीस दलात त्याची मोठी चर्चा आहे. नुकतेच आ.मंगेश चव्हाण यांच्या आरोपानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती मात्र त्याठिकाणी लागलीच निरीक्षक म्हणून राहुल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या या नियुक्तीची चर्चा असून हि नियुक्ती घाईत झाली किंवा तात्पुरती असल्याचे बोलले जात आहे. पुढील दोन दिवसात यावर मोठ्या घडामोडी घडून नवीन निरीक्षक येण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे. गायकवाड यांची बदली झाल्यास पुन्हा चर्चा सुरू होऊ शकतात मात्र एलसीबी निरीक्षक नियुक्ती ही शांततेत आणि जबाबदारीने करावी लागते हे देखील सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यानंतर संपूर्ण जिल्ह्यावर नियंत्रण असलेली एकमेव शाखा म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा. जळगाव जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्याठिकाणी निरीक्षक म्हणून बबन आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. ड्रग्स प्रकरणात अधिवेशनात मुद्दा उपस्थित होताच बबन आव्हाड यांची बदली करून त्याठिकाणी संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. नुकतेच आ.मंगेश चव्हाण यांनी काही मुद्दे उपस्थित केल्याने संदीप पाटील यांची उचलबांगडी करीत त्याठिकाणी विशेष शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दोघांची खरंच चूक होती का?
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षकपदी बबन आव्हाड असो किंवा संदीप पाटील दोघांनी आपले कामकाज योग्य पद्धतीने हाताळले होते. गुन्हे शोध असो किंवा कायदा व सुव्यवस्था हाताळणी ते योग्य पद्धतीने सुरु होते. दोघांच्या काळात जवळपास सर्वच मोठे गुन्हे पोलिसांनी उघड करीत आरोपींना अटक केली होती. ड्रग्स प्रकरणात बबन आव्हाड हे त्यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नसताना देखील त्यांचे नाव पुढे केले गेले आणि त्यांची बदली झाली. तर एका महिलेच्या तोंडी माहितीच्या आधारे आ.मंगेश चव्हाण यांनी जाहीर मांडणी केल्याने संदीप पाटील यांची उचलबांगडी झाली. तसे बघितले तर त्या महिलेने पोलिसात तक्रारच केली नाही आणि तो संदीप पाटलांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रश्न होता. पोलीस प्रशासनातील महिला कर्मचाऱ्यांनी कधीही या अधिकाऱ्यांबद्दल किंवा त्यांच्या कार्यशैलीबाबत जाहीर अथवा चर्चेत तक्रार केली नाही.
सेवा, संस्कार आणि समर्पणाचे पद
पोलीस अधीक्षक पदानंतर संपूर्ण जिल्ह्यावर लक्ष ठेवणे, गुन्ह्यांची उकल करणे, राजकारणी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, संघटना, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकांवर असते. जनतेसह सर्वांना सेवा देणे, वागण्यात, बोलण्यास संस्कार आणि संयम असणे आणि वेळप्रसंगी कर्तव्यासाठी खिशातून समर्पण देखील पोलीस निरीक्षकाला द्यावे लागते. सध्या एलसीबी निरीक्षक म्हणून राहुल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून ते त्यांच्या डॅशिंग कार्यपद्धतीची ओळखले जातात. एलसीबीच्या खुर्चीवर बसताना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर नसेल तर अडचणीला सामोरे जावे लागते हे आजवर अनेकांनी अनुभवले आहे. राहुल गायकवाड यांची कार्यपद्धती एलसीबीला न्याय देईल का हा प्रश्न उपस्थित होत असून आगामी काळात ते समजणार आहे.
घाईचा निर्णय दोन दिवसात बदलणार
आ.मंगेश चव्हाण यांनी मुद्दे उपस्थित केल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी लागलीच एलसीबीचे निरीक्षक संदीप पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करुन त्याठिकाणी जिल्हा विशेष शाखेचे राहुल गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली होती. नियुक्तीपासूनच राहुल गायकवाड यांची नियुक्ती तात्पुरती असल्याची चर्चा होती. गणेशोत्सव आणि ईद मिलाद असे महत्वाचे सण असल्याने त्याठिकाणी निरीक्षक देणे आवश्यक होते त्यामुळे गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती असे बोलले जाते. सध्या सणोत्सव आटोपले असून दोन दिवसात त्यांची बदली होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
हे निरीक्षक आहेत चर्चेत..
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदासाठी सध्या काही नावे चर्चेत असून तिन्ही अधिकाऱ्यांनी यापूर्वी जिल्ह्यात काम केलेले आहे. सध्या जिल्ह्यात कार्यरत असलेले भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ, यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे, अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम, वरिष्ठ आणि जिल्हापेठ पोलीस ठाणे निरीक्षक प्रदीप ठाकूर, शहर वाहतूक शाखेचे पवन देसले यांच्या नावाची जोरदार चर्चा असून जिल्ह्यातून बदलून गेलेले मात्र जवळच असलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या नावाची देखील एलसीबीसाठी चर्चा आहे. पुढील दोन दिवसात चित्र स्पष्ट्च होणार असून पितृपक्ष राहुल गायकवाड यांना पावणार कि पितरांचा आशीर्वाद दुसऱ्या कुणाला मिळणार हे कळणार आहे.






