एसपींच्या टीम एलसीबीला टिप्स, कामगिरीचा घेतला आढावा

महा पोलीस न्यूज । ८ ऑगस्ट २०२४ । जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेत नुकतेच बदलीने अनेक नवीन कर्मचारी हजर झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेत चर्चा करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी बैठक घेतली. काही कर्मचाऱ्यांना कानपिचक्या देत पुढील कामगिरीबाबत त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातील स्थानिक गुन्हे शाखा महत्त्वाची शाखा आहे. एलसीबीत यंदा जम्बो भरती झाली असून सर्वांमध्ये कामगिरीची स्पर्धा लागली आहे. गेल्या महिनाभरचा आढावा घेता टीम एलसीबीने कामगिरीचे जोरदार प्रदर्शन केले आहे. एकमेकात असलेल्या स्पर्धेने अनेक गुन्ह्यांची उकल होत आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनात पथकाचे कार्य जोरात सुरु आहे.
पोलीस अधीक्षक बैठक घेणार असल्याने सर्वच कर्मचारी चिंतेत होते. काहींनी तर कामगिरी कागदावर लिहून घेत पाठांतर देखील केलेलं होते. पोलीस अधीक्षकांनी मैत्रीपूर्ण वातावरणात सर्व आढावा घेतल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
स्थानिक गुन्हे शाखेत नेमणूक करताना पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी तात्पुरते नेमणूक दिली आहे. गेल्या महिनाभरात केलेल्या कामगिरीचा पोलीस अधिक्षकांनी आढावा घेतला. तपास कार्यपध्दती, वर्तवणूक, शिस्त याबाबत. त्यांनी मार्गदर्शन करीत काही कर्मचाऱ्यांना कानपिचक्या देखील दिल्या. सर्वांना धाकात न ठेवता वरिष्ठ म्हणून मित्राप्रमाणे त्यांनी समजावून सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासोबत तिसऱ्यांदा बैठक घेतली. गुन्हे, तपासचा आढावा घेत कर्मचाऱ्यांना गुन्हे शोध संदर्भात मार्गदर्शन केले. कर्मचाऱ्यांच्या काही अडचणी असतील तर त्या जाणून घेतल्या. टीम एलसीबीने सातत्याने चांगली कामगिरी करावी यासाठी त्यांना मार्गदर्शन केल्याचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी महा पोलीस न्यूजशी बोलताना सांगितले.