
जळगाव जिल्हा परिषद ऐतिहासिक पदोन्नती प्रक्रिया; केवळ ५ महिन्यांत २०७ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ
जळगाव (प्रतिनिधी ) : जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत कार्यरत विविध विभागांतील एकूण २०७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी मार्च २०२५ मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांच्या अल्प कालावधीत ही ऐतिहासिक पदोन्नती प्रक्रिया पूर्ण केली.
ही संपूर्ण प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने राबविण्यात आली असून ती पारदर्शक व न्याय्य ठेवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच पदोन्नतीसंदर्भातील सर्व बैठकांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून जिल्हा परिषदेच्या इतिहासात एक अभिनव व आदर्श पाऊल उचलण्यात आले आहे.
विभागनिहाय पदोन्नतीचे तपशील :
बांधकाम विभाग – ११
ग्रामपंचायत विभाग – ११
कृषी विभाग – ५
आरोग्य विभाग – ६३
पशुसंवर्धन विभाग – ७
अर्थ विभाग – १४
सामान्य प्रशासन विभाग – ३
शिक्षण विभाग – ९३
पदोन्नती लाभार्थी पदे :
या पदोन्नतीमध्ये बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता, आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, सेविका, पशुसंवर्धन विभागातील वर्णपचारक, पशुधन पर्यवेक्षक, ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी, कृषी विभागातील विस्तार अधिकारी, शिक्षण विभागातील ग्रेडेड मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी तसेच अर्थ विभागातील सहाय्यक लेखाधिकारी, वरिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ लेखाधिकारी अशा विविध पदांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेतील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली पदोन्नती प्रक्रिया अल्प कालावधीत पूर्ण झाल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या या पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.






