गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला अट्टल गुन्हेगार चार जिल्ह्यांतून तडीपार

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला अट्टल गुन्हेगार चार जिल्ह्यांतून तडीपार
उमरखेड पोलिसांची कारवाई
उमरखेड (प्रतिनिधी) ;- उमरखेड पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमावर तडीपारची कडक कार्यवाही करत त्याला जिल्ह्याबाहेर पाठवले आहे. शेख तैमीर शेख समीर (वय २१, रा. ताजपुरा वार्ड, उमरखेड, जि. यवतमाळ) या इसमाने चोरी, जिवे मारण्याचा प्रयत्न, दुखापत करणे, दुकान जाळणे तसेच जातीय तेढ निर्माण होईल असे गुन्हे केले होते.
त्याच्या विरोधात वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती, मात्र त्याच्या वर्तणुकीत कोणताही सुधार दिसून आला नाही. त्यामुळे पोलीस स्टेशन उमरखेडमार्फत तडीपारचा प्रस्ताव क्र. 09/2024 म. पो. का. कलम 56 (1)(अ) अंतर्गत मा. उपविभागीय दंडाधिकारी, उमरखेड यांच्याकडे पाठविण्यात आला होता.
दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी उपविभागीय दंडाधिकारी, उमरखेड यांनी आदेश जारी करून शेख तैमीर यास यवतमाळ जिल्हा व त्यालगतचे नांदेड, वाशिम व हिंगोली या तीन जिल्ह्यांच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे निर्देश दिले.
सदर आदेशानुसार, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, पोशि टेंभरे यांनी संबंधित इसमास ताब्यात घेऊन जिल्ह्याबाहेर पाठवण्याची कार्यवाही केली.
ही कारवाई यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड तसेच पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड पोलिसांच्या डी.बी. पथकाने यशस्वीपणे पार पाडली.