Social

अनोखी विठ्ठल भक्ती : दगड फोडून कष्ट करणाऱ्या लातूरच्या मुस्लिम तरुणाने विठुरायाला अर्पण केला एक किलो चांदीचा मुकुट ! 

अनोखी विठ्ठल भक्ती : दगड फोडून कष्ट करणाऱ्या लातूरच्या मुस्लिम तरुणाने विठुरायाला अर्पण केला एक किलो चांदीचा मुकुट ! 

लातूर : “धर्म बदलला तरी भक्ती न बदलणारी असते,” हे शब्द खरा करणारा प्रसंग लातूरमध्ये घडला. येथे राहणाऱ्या गणी सय्यद या मुस्लिम तरुणाने विठ्ठलभक्तीचे आगळेवेगळे दर्शन घडवत समतेचा अनोखा संदेश दिला. दगड फोडण्याचे कष्टाचे काम करणाऱ्या या तरुणाने स्वतःच्या कमाईतून तब्बल एक लाख रुपये किमतीचा एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट विठ्ठलमूर्तीला अर्पण केला.

गणी सय्यद हे नियमित मशिदीत नमाज अदा करणारे, पण मनाने सर्वधर्म समभाव जपणारे तरुण. विठ्ठल मंदिर संवर्धनाच्या कामात त्यांचा सहभाग असताना, मंदिरासाठी लागणाऱ्या दगड फोडण्याचे काम त्यांनी हाती घेतले. मंदिरात नियमित ये-जा सुरू झाली आणि विठ्ठलभक्ती मनात रूजली. ही भक्ती इतकी बहरली की त्यांनी हृदयपूर्वक विठ्ठलाच्या चरणी चांदीचा मुकुट अर्पण केला.

शुक्रवारी (ता. २७) गाभाऱ्यात जाऊन त्यांनी विठ्ठलाला साष्टांग नमस्कार घातला. या विलक्षण भक्तीभावाने भारावून गेलेल्या विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी गणी सय्यद यांचा विशेष सत्कार केला.

वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल हे नेहमीच समतेचे प्रतीक मानले जातात. वेगवेगळ्या धर्मांची माणसं येथे एकाच भक्तिभावाने नतमस्तक होतात. गणी सय्यद यांची ही कृती त्याचीच प्रचिती देणारी आहे. “देव, देश आणि धर्म एकच आहेत” हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून जिवंत केला आहे.

लातूरकरांसाठी आणि संपूर्ण समाजासाठी गणी सय्यद यांचे हे उदाहरण नवा आदर्श निर्माण करणारे ठरले आहे – जिथे श्रद्धा आणि समता एकत्र नांदते, तिथेच खरे भक्तीचे मंदिर उभे राहते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button