अश्रू फाउंडेशनतर्फे पळासदडे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

अश्रू फाउंडेशनतर्फे पळासदडे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
अमळनेर (प्रतिनिधी) : “चला अश्रूंची करूया फुले” हे ब्रीदवाक्य घेऊन गेल्या वर्षभरापासून समाजातील गरीब, वंचित व आदिवासी घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या अश्रू फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पळासदडे (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
१९३९ साली स्थापन झालेल्या या शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीमधील सुमारे १२० गरजू विद्यार्थ्यांना नोटबुक, वॉटर बॉटल, टिफिन बॉक्स, रायटिंग पॅड, चॉकलेट आदी शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
या कार्यक्रमास अश्रू फाउंडेशनचे संस्थापक सुनील पाटील, सरचिटणीस रवींद्र खंडेराव मोरे, कमिटी सदस्य गोकुळ पंडित पाटील, हर्षल माहेश्वरी, विनोद चौधरी, गणेश पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे गुलाब नाना पाटील यांनी जबाबदारी सांभाळली.
शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप रामदास चव्हाण, शिक्षकवृंद सौ. सारिका पाटील, सौ. लीना पाटील, सौ. वर्षा पवार, दीपक पाटील तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश पाटील, सदस्य सहादू मोरे, शिक्षणप्रेमी उमाकांत पाटील, उपसरपंच शरद पाटील, शाळेचे माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन शिक्षकवर्गाने केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेली गणेश वंदना, स्वागतगीत व लहानग्यांचे नृत्य या सादरीकरणाने उपस्थित मान्यवरांसह ग्रामस्थांची मने जिंकून घेतली. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाबद्दल अश्रू फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.






