कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक जखमी ; मुक्ताई नगरातील घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) ;– कारने दिलेल्या धडकेत दुचाकी वरील नगरपंचायत कर्मचारी ठार झाल्याची घटना शहरातील बोदवड रस्ता ते प्रवर्तन चौकाच्या दरम्यान राजस्थान मार्बलजवळ शनिवारी सायंकाळी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान घडली. यात एक जण जखमी झाला आहे
मुक्ताईनगर नगरपंचायतीचे कर्मचारी मयूर रवींद्र महाजन असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मयूर महाजन आणि अतुल वराडे हे दोघे दुचाकीने (एमएच १९, एएल ५३४३) बोदवड रस्त्यावरील राजस्थानी मार्बल ते साई वॉशिंग सेंटरच्या दरम्यान जात होते. यावेळी मुक्ताईनगरकडून मलकापूरकडे जाणाऱ्या कार क्रमांक (एमएच २०, सीएच ०५४६) ची जोरदार धडक बसली. त्यात नगरपंचायत कर्मचारी मयूर महाजन (वय ३३) यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी जळगावकडे नेत असताना त्यांची रस्त्यातच प्राणज्योत मालवली. तर अतुल एकनाथ वराडे (वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. अतुल वराडे हे
मुक्ताईनगर येथील सिंचन विभागात कार्यरत होते. मयूर महाजन यांच्या पश्चात आई, वडील दोन बहिणी, पत्नी, दोन वर्षांची लहान मुलगी आहे. मयूर महाजन यांच्या निधनामुळे मुक्ताईनगर शहरात एकच शोककळा पसरली आहे. चारचाकी चालक राम मोहन हंबर्डे रा. मलकापूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सुरेश मेढे करत आहेत.