Crime

कारागृहाचे महानिरिक्षक जालिंदर सुपेकर यांच्याकडील अतिरिक्त पदभार काढला

कारागृहाचे महानिरिक्षक जालिंदर सुपेकर यांच्याकडील अतिरिक्त पदभार काढला

पुणे (प्रतिनिधी) – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आरोपीच्या नातेवाइकांवर तसेच त्यांच्या मदतीचा आरोप असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कारागृह उपमहानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याकडील नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या विभागांचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी त्यांची पुणे विभागात बदली करण्यात आली आहे.

सुपेकर हे वैष्णवीचा पती शशांक हगवणे याचे मामा असून, प्रकरण उघडकीस आल्यापासून त्यांचं नाव सातत्याने चर्चेत येत होतं. वैष्णवीवर होत असलेल्या छळात हगवणे कुटुंबाला पाठीशी घालण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे अखेर त्यांच्याकडून अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ही बदल प्रक्रिया नियमानुसार असल्याचं सांगण्यात येत असलं तरीही, या प्रकरणाचा त्यांच्यावर परिणाम झाल्याची चर्चा प्रशासन वर्तुळात सुरू आहे.

हगवणे कुटुंबीय न्यायालयीन कोठडीत

दरम्यान, वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर हगवणे कुटुंबीयांना कोर्टात हजर करण्यात आलं. यामध्ये सासू लता हगवणे, पती शशांक हगवणे, व नणंद करिश्मा हगवणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सासरे आणि दीर यांच्या पोलीस कोठडीत 31 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

हगवणे कुटुंबातील या आरोपींना येरवडा कारागृहात हलवण्यात आलं आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या संतप्त प्रतिक्रिया आणि न्यायासाठी लढा देणाऱ्या कुटुंबीयांच्या मागण्यांमुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया कशी पार पडते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button