तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना 24 तासांच्या आत अटक; जिल्हाधिकारींनी दिले कडक कारवाईचे आदेश
जळगाव, (जिमाका)- धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे गिरणा नदीतून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात आरोपी आबा ईश्वर कोळी, योगेश ईश्वर कोळी, दिनेश सोमा कोळी, गणेश सोमा कोळी यांनी तलाठी दत्तात्रय पाटील यांच्यावर हल्ला चढवला ज्यात त्यांच्या पायावर फावड्याने वार केल्यामुळे फॅक्चर झाले आहे. या घटनेत तलाठी दत्तात्रय पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी नायब तहसीलदार संदीप मोरे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून कलम 109, 132, 121(2), 303(2) 112(2), 189(2), 191, 190 प्रमाणे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सुचना जिल्हा पोलिस अधिक्षक मा. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व पाळधी दुरक्षेत्र धरणगाव पोलीसांनी चोविस तासाच्या आत गुन्हयातील आरोपी आबा ईश्वर कोळी, योगेश ईश्वर कोळी, दिनेश सोमा कोळी, गणेश सोमा कोळी यांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच गुन्ह्यात वापरलेले 2 ट्रॅक्टर सुद्धा जप्त करण्यात आले आहे.
प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत वाळू माफियांन विरोधात प्रशासन अधिक कठोर पावले उचलणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील सर्व मंत्री, विभागीय आयुक्त यांनी या घटनेची गंभीर दखल घेत योग्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.