‘दगडी बँक’ विक्री तातडीने रद्द करा; नोकरभरती पारदर्शक एजन्सीमार्फतच करा – आ. खडसे

‘दगडी बँक’ विक्री तातडीने रद्द करा; नोकरभरती पारदर्शक एजन्सीमार्फतच करा – आ. खडसे
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा बँकेच्या ऐतिहासिक “दगडी बँक” इमारतीची विक्री करण्याचा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, तसेच बँकेतील २२० कर्मचाऱ्यांची भरती IBPS सारख्या पारदर्शक एजन्सीमार्फतच करण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
खडसे म्हणाले की, “दगडी बँक ही बँकेची ओळख आणि वारसा असून तिच्या विक्रीला आर्थिक गरज नाही. उलट ही इमारत ६५ कोटी रुपयांहून अधिक किमतीची असून तिच्यावर कोणतेही कर्ज नाही. अशा परिस्थितीत पूर्वजांनी उभारलेली ऐतिहासिक मालमत्ता विकण्याचा अधिकार संचालक मंडळाला कोणी दिला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बँकेतील २२० कर्मचाऱ्यांच्या भरतीस राज्य सरकारने परवानगी दिली ही स्वागतार्ह बाब असली तरी भरती शंभर टक्के पारदर्शक असावी, असे त्यांनी नमूद केले. मागील भरती IBPSमार्फत झाल्याने कुठलीही तक्रार आली नव्हती. मात्र, सध्या सचिवांकडून काही जण २०,००० रुपये मागत असल्याच्या तक्रारी आल्याने गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी खडसे यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, “NPA कमी करायचा असेल तर धरणगाव तालुक्यातील बेकायदेशीर केळी लागवडीवर काढलेले कर्ज वसूल करावे, दगडी बँक विकू नये. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन ‘दगडी बँक बचाव’ आंदोलन छेडावे लागेल.”असा इशाराही त्यांनी दिला आहे.






