पुनम चौधरी यांना ‘योगरत्न’ पुरस्कार

पुनम चौधरी यांना ‘योगरत्न’ पुरस्कार
रावेर प्रतिनिधी l खिर्डी येथील सुप्रसिद्ध योग प्रशिक्षिका पुनम पंकज चौधरी यांना ‘योगरत्न पुरस्कार’ मिळाल्याने संपूर्ण रावेर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए.जी.एम.ए. व आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात हा सन्मान रविवार, दिनांक २२ जून रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या दिमाखात प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास महाराष्ट्रभरातील योग शिक्षक, योग थेरपिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गौरव सोहळ्याचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून डॉ. बाळासाहेब पवार, प्रदेशाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल (शिक्षण सम्राट) यांनी उपस्थिती लावली. प्रमुख पाहुण्यांमध्ये उद्योजक मनोज दांडगे, तसेच डॉ. नितीन राजे पाटील (व्हाइस चेअरमन, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन), डॉ. सतीश कराळे (चेअरमन), डॉ. बाबुराव कानडे (अध्यक्ष), दिशा चव्हाण, प्रशांत सावंत, प्रा. कुणाल महाजन, मनोहर कानडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
योगसाधना व समाजप्रबोधन क्षेत्रातील कार्याबद्दल पुनम पंकज चौधरी यांना मिळालेला ‘योगरत्न’ पुरस्कार ही केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर रावेर तालुक्यासाठीही अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांचा सत्कार होताच तालुक्यातून विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
पुनम पंकज चौधरी या ॲड. पंकज चौधरी यांच्या पत्नी असून त्यांच्या कार्यामुळे महिलांमध्ये योगविषयी जागरूकता वाढण्यास मोठे योगदान मिळाले आहे.