अमळनेर पोलिसांतर्फे “वॉक फॉर युनिटी”चे आयोजन; नागरिकांना सहभागाचे आवाहन

अमळनेर पोलिसांतर्फे “वॉक फॉर युनिटी”चे आयोजन; नागरिकांना सहभागाचे आवाहन
अमळनेर प्रतिनिधी : भारताचे पहिले गृहमंत्री आणि ‘लौहपुरुष’ म्हणून ओळखले जाणारे मा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अमळनेर पोलिस स्टेशनतर्फे “वॉक फॉर युनिटी” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम एकता, सामाजिक सलोखा आणि बंधुत्व वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता अमळनेर शहरातील महाराणा प्रताप चौक येथून सुरु होणार आहे.
या एकात्मता दौडीत शहर व तालुक्यातील मान्यवर नागरिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, महाविद्यालय व शाळांतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार आणि तरुण वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे.
“वॉक फॉर युनिटी” या उपक्रमातून सरदार पटेल यांच्या अखंड भारताच्या स्वप्नाला आणि त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार असून, सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय एकतेचा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार आहे. नागरिकांनी सकाळी ७ वाजता वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असेही आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.






