जालन्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात १० तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई, ३५ कोटींचा गैरव्यवहार उघड

जालन्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात १० तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई, ३५ कोटींचा गैरव्यवहार उघड
जालना (प्रतिनिधी) – जालना जिल्ह्यात अतिवृष्टी व गारपीटीच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणात तब्बल १० तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बनावट शेतकरी दाखवून अनुदानाची रक्कम अपहार केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.
२०२२ ते २०२४ दरम्यान जालना जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले होते. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला होता. मात्र, या अनुदान वाटप प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले होते.
प्राथमिक तपासात अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील २६ ग्रामस्तरीय महसूल अधिकारी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी बनावट नावांनी अनुदान घेतल्याचे समोर आले. या गैरव्यवहाराची एकूण रक्कम तब्बल ३५ कोटी रुपये इतकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर १० तलाठ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून उर्वरित अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.
निलंबित तलाठ्यांची नावे पुढीलप्रमाणे : गणेश मिसाळ, कैलास घारे, विठ्ठल गाडेकर, बाळू सानप, पवन सुलाने, शिवाजी ढालके, कल्याण बमणावत, सुनील सोरमारे, प्रवीण शिनगारे, बी.आर. भुसारे.
या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, सर्व अनुदान वाटप प्रक्रियेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.