Other

भडगाव रेशन घोटाळ्याच्या विरोधात मनसेचे आक्रमक पाऊल; ७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

 

भडगाव रेशन घोटाळ्याच्या विरोधात मनसेचे आक्रमक पाऊल; ७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

भडगाव – प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील रेशन मालाच्या कथित गैरव्यवहारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुक्यातील रेशन गोडाऊन आणि दुकानदारांकडून होणाऱ्या मालाच्या लुटीविरोधात मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ७ जुलै २०२५ (सोमवार) रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे.

तालुक्यातील अनेक रेशन दुकानांमध्ये लाभार्थ्यांसाठी आलेल्या शासकीय रेशन मालामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात चित्रफीत स्वरूपात ठोस पुरावे तयार करून संबंधित पुरवठा अधिकारी व तहसीलदार, भडगाव यांना ९ व २५ एप्रिल रोजीच निवेदने देण्यात आली होती. त्यानंतरही कारवाई करण्यात आली नाही. यावरून प्रशासनाकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

२१ मे रोजी उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांनाही निवेदन देण्यात आले. परंतु दोन महिने उलटूनही प्रकरणाची साधी चौकशीदेखील करण्यात आली नसल्याने मनसेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. उलट संबंधित अधिकारी वेळ काढून पुरावे पुसण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोपही करण्यात आला आहे.

मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांच्या म्हणण्यानुसार, “या गैरव्यवहारात रेशन गोडाऊनमधील कर्मचारी, पुरवठा अधिकारी आणि काही रेशन दुकानदार मिळून सहभागी आहेत. हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच सुरू आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. ‘चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या’ अशीच सध्या भडगावची अवस्था झाली आहे.”

या पार्श्वभूमीवर, मनसेने पुढील मागण्या केल्या आहेत:

संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

कमी रेशन देऊन लाभार्थ्यांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने तात्काळ रद्द करावेत.

या प्रकरणात सामील असलेल्या व्यक्तींच्या मालमत्तेची सखोल चौकशी करावी.

जर प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही, तर न्यायालयीन लढा उभारावा लागेल, असा इशारा मनसेने दिला आहे.

या संपूर्ण निवेदनावर मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांची स्वाक्षरी असून, प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button