महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन ; पुणे भाजप सरचिटणीसावर विनयभंगाचा गुन्हा

महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन ; पुणे भाजप सरचिटणीसावर विनयभंगाचा गुन्हा
पक्षाकडून तातडीने राजीनामा
प्रतिनिधी | पुणे
भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे याच्यावर महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याच्याविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २३ जून रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे दौर्यादरम्यान शनिवारवाडा येथे घडली. यावेळी संबंधित महिला पोलिस अधिकारी सुरक्षा व्यवस्थेच्या कामावर नियुक्त होती. प्रमोद कोंढरे याने तिच्याशी अश्लील आणि अनुचित वर्तन केले. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
घटनेनंतर भाजपने तात्काळ कारवाई करत प्रमोद कोंढरे याचा राजीनामा घेतला. पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले की, “कोंढरे यांचे वर्तन अत्यंत दुर्दैवी असून, पक्षाने तातडीने राजीनामा स्वीकारला आहे.”
या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.