
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी यंदा प्रभावी मोहीम राबवली असून, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ नऊ महिन्यांच्या कालावधीत तब्बल १० हजार ७०२ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी कारवाया झाल्या असल्या तरी त्या अधिक प्रभावी ठरल्या आहेत.
प्रतिबंधात्मक कारवायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना वचक बसला असून, अनेक हिस्ट्रीशीटर गपगार झाले आहेत. पोलीस विभागाच्या या सक्रिय भूमिकेमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अधिक सक्षम झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या नऊ महिन्यांतील कारवायांमध्ये जिल्हाभरात विविध कायद्यांनुसार पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
• बीएनएस कलम १२६ नुसार : ७७१६ प्रकरणे
• बीएनएस कलम १२७ नुसार : ८ प्रकरणे
• बीएनएस कलम १२८ नुसार : २३० प्रकरणे
• बीएनएस कलम १२९ नुसार : ६८४ प्रकरणे
• बीएनएस कलम १७० नुसार : ३ प्रकरणे
• बीएनएस कलम १६३ नुसार : १३०७ प्रकरणे
• दारूबंदी कायदा अंतर्गत : ४८८ प्रकरणे
• बीपी एक्ट कलम १२२ नुसार : १२२ प्रकरणे
• बीपी एक्ट कलम १२४ नुसार : २८ प्रकरणे
• बीपी एक्ट कलम ५५ नुसार : ५ प्रकरणे
• बीपी एक्ट कलम ५६ नुसार : ८७ प्रकरणे
• बीपी एक्ट कलम ५७ नुसार : ११ प्रकरणे
• एमपीडीए कायद्यानुसार : २ प्रकरणे
गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न
सर्व कारवायांमुळे जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना धडा शिकवला गेला आहे. नियमित गस्त, गुप्त माहितीच्या आधारे तातडीने कारवाई आणि स्थानिक पोलिस ठाण्यांमधील समन्वय यामुळे अनेक गंभीर गुन्हे टळले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि ठाणेप्रमुख यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य दिले आहे.
गेल्या वर्षीपेक्षा घट, पण कारवाई अधिक परिणामकारक
गेल्या वर्षी निवडणुकीचा काळ असल्यामुळे त्या वर्षी प्रतिबंधात्मक कारवायांचा आकडा मोठा होता. मात्र, या वर्षी आकडा किंचित कमी असला तरी कारवायांचा परिणाम अधिक ठळकपणे जाणवतो. पोलिसांच्या या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहिल्याचे दिसून आले आहे. जळगाव जिल्हा पोलिसांनी राबवलेल्या या व्यापक प्रतिबंधात्मक मोहिमेमुळे गुन्हेगारांच्या मनात पोलिसांविषयी भीती निर्माण झाली असून, नागरिकांचा विश्वास अधिक बळकट झाला आहे.






