दोन घरफोडी व एक दुचाकी चोरी प्रकरण उघड, तब्बल ३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
चौघांना अटक ; रामानंद नगर पोलिसांची मोठी कामगिरी

दोन घरफोडी व एक दुचाकी चोरी प्रकरण उघड, तब्बल ३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
चौघांना अटक ; रामानंद नगर पोलिसांची मोठी कामगिरी
जळगाव : शहरातील रामानंद नगर पोलिसांनी कसून तपास करून दोन घरफोडी व एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून चार आरोपींकडून तब्बल ३४ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जळगाव शहरातील घरफोड्यांच्या मालिकेला आळा बसण्यास मदत होणार आहे.
याबाबत माहिती अशी की, १५ मे ते १ जून २०२५ या कालावधीत मोहाडी रोडवरील न्यू पार्वतीबाई काळे नगर परिसरातील नरेंद्र वाघ यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत सुमारे ३५ लाख ७० हजार रुपयांचे ३५७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २५ हजार रुपयांचे २५० ग्रॅम चांदीचे दागिने, ८५ हजार रुपये रोख तसेच डीव्हीआर, मॉडेम असा एकूण ३६ लाख ८३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांना दोन जण संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. चौकशीअंती त्यांनी घरफोडीची कबुली दिली. त्यानुसार आरोपी रवि प्रकाश चकाण (रा. तांबापुरा, जळगाव) आणि शेख शकील शेख रफिक (रा. मौलीगंज, धुळे ह.मु. सालार नगर, जळगाव) यांना अटक करण्यात आली. पुढील तपासात त्यांच्या साथीदारांची नावे समोर आली असून जुनेद उर्फ मुस्तकीम भिकन शहा (रा. मच्छीबाजार, तांबापुरा, जळगाव) व गुरुदयालसिंग मनजित टाक (रा. शिरसोली नाका, तांबापुरा, जळगाव) यांनाही ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपींनी सोन्या-चांदीचा ऐवज सुरत व जामनेर येथे विकल्याचे तसेच चोरीस गेलेली दुचाकी समता नगर परिसरात लपविल्याचे उघड केले. त्यानुसार पोलिसांनी सुरत व जामनेर येथून ३३ लाख ७९ हजार रुपयांचे ३१० ग्रॅम सोन्याचे दागिने, २५ हजार रुपयांचे २५० ग्रॅम चांदीचे दागिने व ४५ हजार रुपयांची एमएच-१९ बीडब्ल्यू-९१४४ क्रमांकाची अॅक्टीवा दुचाकी असा एकूण ३४ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भूषण कोते, हवालदार जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, सुधाकर अंभोरे, नाईक योगेश बारी, विनोद सुर्यवंशी, अतुल चौधरी, रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, पोशि. अनिल सोननी, नितेश बच्छाव, गोविंदा पाटील, दीपक वंजारी व चालक हवालदार प्रमोद पाटील यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.






