PoliticsSocial

बांभोरी ग्रामपंचायतीच्या दप्तराची होणार सखोल चौकशी

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची अचानक भेट; प्रथमदर्शनी अनियमितता आढळल्याने आदेश

बांभोरी ग्रामपंचायतीच्या दप्तराची होणार सखोल चौकशी

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची अचानक भेट; प्रथमदर्शनी अनियमितता आढळल्याने आदेश

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी धरणगाव तालुक्यातील बांभोरी प्र.चा. ग्रामपंचायतीस बुधवारी (9 सप्टेंबर) अचानक भेट देऊन विविध कामांची पाहणी केली. ग्रामपंचायतीच्या दप्तराची तपासणी करताना प्रथमदर्शनी काही अनियमितता आढळून आल्याने संबंधित अभिलेख व दप्तराची सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली आहे.

अचानक भेटीत दप्तराची तपासणी

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर या धरणगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी बांभोरी प्र.चा. ग्रामपंचायतीला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीतील विविध अभिलेख, दप्तर तसेच संबंधित कामकाजाची पाहणी केली. तपासणीदरम्यान काही बाबींमध्ये प्रथमदर्शनी अनियमितता निदर्शनास आल्याने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती तपासण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

जिल्हा परिषद शाळेचीही पाहणी

दौऱ्यादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी बांभोरी येथील जिल्हा परिषद शाळेलाही भेट दिली. शाळेतील स्वच्छता, परिसराची देखभाल आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सुविधांची त्यांनी पाहणी केली.

विद्यार्थ्यांशी साधला संवाद

नायर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना विविध विषयांचे कितपत आकलन झाले आहे, याची माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेबाबत त्यांनी शिक्षकांशीही चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने सुधारणा होण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

निपुण ॲप’च्या प्रभावी वापराच्या सूचना

शाळेतील शिक्षकांना ‘निपुण ॲप’चा काळजीपूर्वक आणि प्रभावी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. निपुण अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययनाशी संबंधित छोट्या-छोट्या बाबींवरही विशेष लक्ष देऊन त्यांची शैक्षणिक प्रगती उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी दिले.

घनकचरा व्यवस्थापनाचीही माहिती

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांचीही त्यांनी माहिती घेतली. घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने, गुणवत्तापूर्ण आणि विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या पाहणी दौऱ्यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे तसेच धरणगावचे गटविकास अधिकारी सागर कोल्हे उपस्थित होते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button