राख चोरीप्रकरणी तिघांविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल

राख चोरीप्रकरणी तिघांविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल
वरणगाव (ता. भुसावळ) : दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातून विकत घेतलेली राख शेतात साठवलेली असताना ती चोरून नेल्याच्या प्रकारात तिघांविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ मेच्या रात्रीपासून २९ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सुसरी शिवारात घडली.
अमनप्रीत जैसविंदरसिंग सनसोय (वय ३६, रा. निंभोरा बु. त्रिमूर्ती हॉटेलजवळ, दीपनगर) यांनी दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातून खरेदी केलेली राख सुसरी शिवारातील गट नं. ४४ मध्ये हर्षदा किशोर धांडे यांच्या शेतात साठवून ठेवली होती. एकूण ९०० टनांपैकी ८९० टन राख तिथे साठवलेली होती.
सदर राख ही अमनप्रीत सनसोय यांच्या संमतीविना चोरी केल्याचा आरोप अवनुरसिंग गुरविंदसिंग चहाल, गुरविंदसिंग इंदरसिंग चहाल (दोघेही रा. चहाल पंजाबी ढाबा, ता. भुसावळ) आणि चेतन पाटील (पूर्ण नाव अज्ञात, रा. सुसरी, ता. भुसावळ) यांच्यावर आहे. तिघांनी संगनमताने लबाडीच्या उद्देशाने राख चोरल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दीपनगर परिसरात अलीकडच्या काळात राख चोरीच्या घटना वाढल्यामुळे अधिकृत खरेदीदारांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनासमोर ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक फौजदार श्रावण जवरे तपास करीत आहे.