८६० किलोचे लोखंडी गेट, जाळी चोरणारा एलसीबीच्या जाळ्यात
महा पोलीस न्यूज | १ एप्रिल २०२४ | जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने शेताच्या सुरक्षिततेसाठी लावलेले लोखंडी गेट आणि तारेची जाळी असे ८६० किलो लोखंड चोरून नेले होते. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहिती काढून एकाच्या मुसक्या आवळल्या असून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेताच्या संरक्षणा करीता लावण्यात येणारे २०० किलो वजनाचे लोखंडी गेट व ६६० किलो वजनाचे जाळीचे लोखंडी ताराचे ११ बंडल असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विटनेर गावातील समाधान अशोक गायकवाड (भिल), वय २८ याने ही चोरी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच पथकाला सूचना देत रवाना केले होते.
पथकाने विटनेर गावातून समाधान अशोक गायकवाड (भिल) याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने कबुली देत मुद्देमाल चोरी करून घरा मागच्या खळ्यात ठेवला असल्याचे सांगितले. पथकाने लागलीच त्याच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आणि त्याला अटक करीत एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.
या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या सूचनेनुसार सपोनि अमोल मोरे, पोउनि गणेश चोभे, सफौ अनिल जाधव, पोह सुनिल दामोदरे, पोह प्रविण मांडोळे, पोना हेमंत पाटील, बबन पाटील, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकुर यांनी केली आहे.