जळगावच्या डॉक्टर दांपत्याने विमानात वाचवले प्रवाशाचे प्राण
महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | जळगाव येथील नारखेडे डॉक्टर दाम्पत्य बुधवारी रात्री विमानाने लंडनहून मुंबईला येत होते. विमानात अचानक एका प्रवाशाची प्रकृती खालावल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले. केबीन कर्मचाऱ्यांनी विचारणा केल्यावर जळगावच्या डॉक्टरांनी तात्काळ मदत केल्याने प्रवाशाचे प्राण वाचले आहेत.
जळगाव येथील त्वचारोग तज्ञ डॉ.गिरीश नारखेडे हे पत्नी लिना नारखेडे यांच्यासह बुधवारी रात्री लंडन येथील हिथ्रो विमानतळहून मुंबईला येण्यासाठी निघाले होते. भारतीय वेळेनुसार रात्री १२ वाजेच्या सुमारास अचानक एका प्रवाशाला अस्वस्थ वाटू लागले. प्रवाशाची अवस्था बघून विमानातील कर्मचाऱ्यांनी कुणी डॉक्टर आहे का? अशी विचारणा केली.
जळगावचे डॉ.गिरीश नारखेडे आणि डॉ.लीना नारखेडे यांनी तत्काळ प्रतिसाद देत त्या प्रवाशाला गाठले. जागेवरच त्याची प्राथमिक तपासणी केली असता त्याच्या हृदयाची गती आणि रक्तदाब मंदावला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विमानातील केबिन कर्मचाऱ्यांना विचारणा केल्यावर त्यांनी काही औषधे दाखवली. नारखेडे डॉक्टर दांपत्याने प्रवाशाला काही औषधे दिल्यावर त्याला थोड्या वेळात आराम पडला.
डॉ.गिरीश नारखेडे आणि डॉ.लीना नारखेडे यांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे एका प्रवाशाचे प्राण वाचले. विमान कंपनी, कर्मचारी आणि इतर प्रवाशांनी डॉ.नारखेडे दांपत्याचे आभार मानले.