खाकीची जीवावर बाजी : जळगावात रेल्वेखाली आलेल्या चिमुकलीचे वाचवले प्राण
महा पोलीस न्यूज । २१ जून २०२४ । महाराष्ट्र पोलीसदलातील खाकी नेहमीच जनतेच्या कामी येत असते. संकटात ऊन, पाऊस, थंडीची पर्वा न करता पोलीसदादा आपले कर्तव्य बजावत असतात. जळगाव जिल्हा पोलीस दलात एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आज ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’चा प्रत्यय दिला आहे. जीवाची बाजी लावत पोलीस कर्मचाऱ्याने रेल्वेखाली आलेल्या चिमुकलीचे प्राण वाचवले आहे.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य जळगाव पोलिसाने सार्थ ठरवले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी फिरोज तडवी हे गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास शासकीय कामनिमित्त सेवाग्राम एक्सप्रेसने नाशिक जाण्यासाठी जळगाव रेल्वेस्थानकावर आले होते. पहाटेची वेळ असल्याने बहुतांश प्रवासी झोपेत होते तर रेल्वे येताच प्रवाशांची एकच गर्दी झाली.
चिमुकली हातातून निसटली अन्..
सेवाग्राम एक्सप्रेस पहाटे ४.२४ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर आली असता एक महिला प्रवाशी हातात एक बाळ आणि दुसऱ्या हातात दोन वर्षीय मुलीला घेऊन रेल्वेत चढत होती. घाईघाईत रेल्वेत चढताना अचानक चिमुकलीचा हात निसटला आणि ती थेट रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील अंतरातून रेल्वेखाली दोन्ही रुळाच्या मधोमध पडली.
पोलीस कर्मचाऱ्याने लावली जीवाची बाजी
चिमुकली खाली पडणे आणि रेल्वेला हिरवा सिग्नल मिळण्याची वेळ एकच झाली. पोलीस कर्मचारी फिरोज तडवी यांनी क्षणाचाही विलंब न करता रेल्वेखाली अंग झोकून दिले. कमरेवरील संपूर्ण शरीर रेल्वे रुळाखाली टाकत दोन्ही हाताने त्यांनी चिमुकलीला बाहेर काढले. घटनेची माहिती कळताच रेल्वे पोलिसांनी धाव घेतली आणि महिलेला आपल्या दालनात बसविले.
..तर गेला असता दोघांचा जीव
फिरोज तडवी यांनी चिमुकलीला बाहेर काढताच रेल्वे पुढे मार्गस्थ झाली. पहाटेची वेळ असल्याने बहुतांश प्रवाशी झोपलेले होते तर इतर प्रवाशी घाईत असल्याने कुणीही चेन पुलींग केली नाही. चिमुकलीला बाहेर काढण्यास काही सेकंदाचा जरी उशीर झाला असता तर दोघांचाही जीव गेला असता. दैव बलवत्तर असल्याने दोघांचा जीव वाचला आहे.
पोलीस अधीक्षकांसह सर्वांनी केले कौतुक
एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचारी फिरोज तडवी यांनी जीवाची बाजी लावून एका चिमुकलीचा जीव वाचवल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फिरोज तडवी यांचे रेल्वेस्थानकावर उपस्थित असलेले प्रवाशी, नागरिक यांनी टाळ्या वाजवून कौतुक केले. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, ठाणे पोलीस उपअधिक्षक सुनील कुराडे, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक बबन आव्हाड यांनी देखील फोनवरून फिरोज तडवी यांचे कौतूक केले आहे.