महावितरण अभय योजना 30 नोव्हेंबर पर्यंतच सुरु
जळगाव– 31 मार्च 2024 पर्यंत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर थकबाकीदारांसाठी महावितरणची अभय योजना-2024 सुरु आहे. जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या जळगाव परिमंडलात योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. 1 सप्टेंबर 2024 रोजीपासून ही योजना सुरू झाली. सदर योजना 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरु आहे. योजना काळात 22 नोव्हेंबर 2024 पर्यंत जळगाव परिमंडलातील लघुदाब व उच्चदाब श्रेणीतील 3102 ग्राहकांनी 3 कोटी 89 हजार रुपयांचा भरणा केलेला आहे. योजनेच्या कालावधीत परिमंडलातील 3102 ग्राहकांनी 3.09 कोटी रुपयांचा भरणा केला आहे. या योजनेमुळे 3102 वीज ग्राहकांचे व्याज आणि विलंब आकारांचे एकूण 86.04 लाख रूपये माफ झाले आहेत.
कृषी व सार्वजनिक पुरवठा योजना वर्गवारीतील ग्राहक वगळून 31 मार्च 2024 पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या सर्व लघुदाब आणि उच्चदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे. योजनेत थकबाकीमुक्त होणाऱ्या खंडित ग्राहकांना नवीन वीज जोडणीची संधी देणारी ही योजना आहे.
योजनेनुसार पूर्ण मुद्दल भरणाऱ्या ग्राहकांना वीज बिलातील शंभर टक्के व्याज व विलंब आकार माफ असणार आहे. महावितरणच्या या अभय योजनेमध्ये 1 सप्टेंबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंतच सहभाग घेता येणार आहे. तरी अधिकाधिक कायम स्वरुपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनी योजनेत सहभागी होऊन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता श्री आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.
योजनेनुसार देय रकमेचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना दहा टक्के तर उच्चदाब ग्राहकांना पाच टक्के सूट असणार आहे. एकरकमी अथवा एकूण वीजबिलाच्या 30 टक्के रक्कमेचा भरणा केल्यास नवीन जोडणी अथवा पुनर्जोडणी घेण्याची तत्काळ संधी उपलब्ध आहे. एकरकमी अथवा देय वीजबिलाचा 30 टक्के रक्कम भरून व्याजमुक्त सहा हप्ते भरण्याची सोयही योजनेत उपलब्ध आहे.
1 सप्टेंबर 2024 पासूनच्या योजना काळात 22 नोव्हेंबर 2024 पर्यंत जळगाव जिल्हयातून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या 1979 ग्राहकांनी योजनेत 2 कोटी 19 लाख रुपयांचा एकरकमी वीजबिल भरणा केला आहे.
धुळे जिल्ह्यातून 782 ग्राहकांनी 55 लाख 55 हजार रुपयांचा तर नंदुरबार जिल्ह्यातून 139 ग्राहकांनी 33 लाख 55 हजार रुपयांचा एकरकमी वीजबिल भरणा केला आहे.
जागेची मालकी, ताबेदार किंवा खरेदीदार यांच्यात बदल झाला असला तरी थकबाकीदारांना वीजबिलाच्या थकबाकीची रक्कम भरणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे थकबाकीदारांना थकबाकीमुक्त होण्यासाठी तसेच सदर जागेमध्ये नवीन वीज जोडणी घेण्यासाठी, ही योजना एक मोठी संधी आहे. थकीत ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात येत आहे.