
प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने तरुणाची आत्महत्या
आत्महत्येपूर्वी व्हिडिओद्वारे मित्रांना ‘प्रेम करू नका’ असे आवाहन
अमळनेर : प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने आलेल्या नैराश्यातून गांधली येथील गौरव रवींद्र बोरसे (वय २१) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमळनेर शहरात घडली आहे. बुधवारी, ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास क्रीडा संकुलाजवळच्या डुबकीचा मारोती रस्त्यावर ही घटना उघडकीस आली.
गौरवने रस्त्यालगतच्या एका झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोहेकॉ विनोद भोई, पोहेकॉ मिलिंद बोरसे आणि विनोद संदानशिव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गौरवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
व्हिडिओद्वारे व्यक्त केली व्यथा
गौरवने आत्महत्या करण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्याने आपल्या आईला विनवणी केली की, “आई, माझ्या जाण्यानंतर तू रडू नकोस. मी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही.” तसेच, वडिलांचा उल्लेख करत त्याने सांगितले की, “बापाला शिकव”. त्याने आपल्या मित्रांनाही आवाहन करत, “मित्रांनो, प्रेम करू नका. आपापल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा,” असे म्हटले.
व्हिडिओमध्ये गौरवने सांगितले की, तो ‘सीमा’ (नाव बदललेले) नावाच्या मुलीवर प्रेम करत होता आणि अल्पवयीन असतानाच त्यांनी लग्न केले होते. मात्र, आता तिने त्याला नकार दिला असून, त्याला विसरून गेल्याचे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. गौरवने व्हिडिओमध्ये, “माझे खरे प्रेम आहे, म्हणून मी माझे जीवन संपवत आहे. मी आई-वडिलांना सोडून जायला नको, पण जी चूक मी करत आहे ती तुम्ही करू नका,” असेही म्हटले आहे.
भूषण हेमराज सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल विनोद भोई या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत






