
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील गरजू रुग्णांसाठी दिलासादायक ठरणारा उपक्रम आजपासून सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर, अभिषेक पाटील फाउंडेशन आणि समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ना नफा ना तोटा या तत्वावरॲम्बुलन्स सेवा जळगावकर जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सेवेमुळे अपघातग्रस्त, तातडीच्या वैद्यकीय गरजा असलेले रुग्ण तसेच दूरवरून उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना वेळीच रुग्णवाहिकेची सुविधा मिळणार आहे. शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वैद्यकीय गरजांचा विचार करून ही सेवा सुरू करण्यात आली असून, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ती वरदान ठरणार आहे.
या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन अभिषेक पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी त्यांचे वडील शांताराम पाटील, आई कल्पना पाटील, आणि पत्नी अरुंधती पाटील देखील उपस्थित होते.
अभिषेक पाटील म्हणाले, “सामान्य जनतेसाठी काहीतरी उपयोगी आणि स्थायी स्वरूपाचे काम करावे, ही नेहमीच इच्छा होती. आजपासून सुरू होणारी ही मोफत ॲम्बुलन्स सेवा म्हणजे जनसेवेच्या वाटचालीत टाकलेलं एक सकारात्मक पाऊल आहे.”
या उपक्रमाचे जळगाव शहरातील अनेक सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून भरभरून स्वागत करण्यात येत आहे. “जनतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा” या तत्त्वाला अनुसरून, अभिषेक पाटील फाउंडेशनचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.