ब्रेकिंग : २ हजाराची लाच घेताना दोन सहाय्यक फौजदारसह पंटर जाळ्यात

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात पोळ्याच्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली आहे. वारंट बजावणीमध्ये अटक न करण्यासाठी खाजगी पंटर मार्फत २ हजारांची लाच स्विकारल्याप्रकरणी २ सहाय्यक फौजदार जाळ्यात सापडले आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका ४७ वर्षीय व्यक्तीविरुद्ध खामगाव न्यायालयात चेक बाऊन्सची (कलम १३८) केस दाखल होती. या प्रकरणी न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते. अटक टाळण्यासाठी आणि वॉरंट रद्द करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मोबदल्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण मुकुंदा पाटील (वय ५५) आणि सहाय्यक फौजदार आत्माराम सुधाम भालेराव (वय ५७) यांनी तक्रारदाराकडून ५ हजार लाचेची मागणी केली. तक्रारदाराने या संदर्भात जळगाव येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
नाहाटा चौफुलीजवळ पंटरने स्वीकारली लाच
तक्रारीची पडताळणी करण्यासाठी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पथकाने सापळा रचला होता. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, २ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान बाळकृष्ण पाटील यांच्या सांगण्यावरून खाजगी व्यक्ती ठाणसिंग प्रतापसिंग जेठवे (वय ४२) यांनी नाहटा चौफुलीजवळ लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर पथकाने सहाय्यक फौजदार आणि हवालदार यांना देखील ताब्यात घेतले.
पोलीस प्रशासनात खळबळ
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांना ताब्यात घेऊन जळगाव कार्यालयात आणले असून अधिक चौकशी सुरू आहे. भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
लाचखोरीविरोधात जनतेला आवाहन
एसीबीने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरित एसीबी, जळगावशी संपर्क साधावा. यासाठी ०२५७-२२३५४७७ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.






