ACB Trap : सामाजिक वनीकरणच्या तिघांना नडला ३६ चा आकडा, लाच घेताना रंगेहात

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । पारोळा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत सामाजिक वनीकरण विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांवर लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांबू लागवडीसाठीच्या चार फाईल्स मंजूर करण्याकरिता ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना हे कर्मचारी रंगेहाथ पकडले गेले.
या प्रकरणी वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बबनराव कापुरे (वय ५४), लिपिक निलेश मोतीलाल चांदणे (वय ४५) आणि कंत्राटी कर्मचारी कैलास भरत पाटील (वय २७) यांना अटक करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील एका ३० वर्षीय शेतकऱ्याने त्यांच्यासह तीन नातेवाईकांच्या शेतात बांबू लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडे अर्ज केला होता. अमृत महोत्सवी फळझाड/वृक्ष लागवड योजनेअंतर्गत बांबू लागवडीसाठीच्या चार फाईल्स मंजूर करण्याकरिता वन परिक्षेत्र अधिकारी मनोज कापुरे यांनी प्रत्येक फाईलसाठी १० हजार रुपये, अशा एकूण ४० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ही रक्कम ३६ हजार रुपये निश्चित करण्यात आली.
याबाबत शेतकऱ्याने जळगाव एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने सापळा रचून पडताळणी केली असता, कापुरे आणि चांदणे यांनी ३६ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम कंत्राटी कर्मचारी कैलास पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले होते. त्यानुसार, पाटील यांनी पंचांसमक्ष ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर एसीबीने तात्काळ तिन्ही आरोपींना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे शासकीय कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांना आवाहन :
कुठल्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास, तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक: 0257-2235477, टोल फ्री क्रमांक: 1064.