गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या दोघांना दोन गावठी पिस्तूल, काडतूसांसह अटक

गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या दोघांना दोन गावठी पिस्तूल, काडतूसांसह अटक
भुसावळ बाजारपेठ पोलिसांची मोठी कारवाई
भुसावळ प्रतिनिधी
शहरात गंभीर गुन्ह्याची तयारी करणाऱ्या दोन आरोपींना भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध (डी.बी.) पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तुलांसह तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत पोलिस पथकाने दाखवलेले तत्पर आणि शौर्यपूर्ण काम कौतुकास्पद ठरले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कस्तुरी नगर परिसरातील कुणाल नितीन ठाकूर (वय 19) हा युवक रंगोली हॉटेलजवळील त्रीमुर्ती प्रोव्हिजन दुकानासमोर गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसांसह फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने कारवाई केली.
सदर ठिकाणी जाऊन आरोपी कुणाल ठाकूर याला ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीत त्याच्याकडून एक लोखंडी गावठी पिस्तुल, मॅगझीन आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. चौकशीदरम्यान त्याने ही पिस्तुल वरणगाव येथील उदय राजू उजलेकर (वय 24) याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी उदय उजलेकर यालाही ताब्यात घेतले. त्याने अजून एक गावठी पिस्तुल वरणगाव येथे लपवून ठेवल्याचे उघड केल्याने तेथून आणखी एक पिस्तुल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
दोन्ही आरोपींकडून एकूण दोन लोखंडी गावठी पिस्तुल, मॅगझीनसह आणि तीन जिवंत काडतुसे, असा सुमारे 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या यशस्वी कारवाईत पोलीस राहुल वाघ, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोलीस हवालदार विजय नेरकर, पोलीस हवालदार राजेश काळे, पोलीस नाईक जावेद शहा, पोलीस नाईक पंकज तायडे, चालक सुनिल सोनवणे, चालक हसमत अली सय्यद, तसेच पोलीस कर्मचारी सचिन चौधरी, हर्षल महाजन, जीवन कापडे, महेंद्र पाटील, भुषण चौधरी, अमर अडाडे, प्रशांत सोनार, योगेश माळी, योगेश महाजन यांनी सहभाग घेतला.
या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी केले असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार विजय नेरकर करीत आहेत.






