
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । महाराष्ट्रात महायुती सरकारकडून माता भगिनी, तरुण, शेतकऱ्यांसाठी एकापेक्षा एक सरस योजना राबवल्या जात आहे. सर्व महिलांना माहिती आहे की जेव्हा त्या कमाई करायला लागतात तेव्हा त्यांचा सन्मान वाढतो, परिवाराची प्रगती होते. काही वर्षापूर्वी ही स्थिती नव्हती. महिलांच्या नावे मालमत्ता नसायची, बँकेतून कर्ज मिळत नव्हते म्हणून मी एक संकल्प केला. काहीही झाले तरी महिला भगिनींच्या अडीअडचणी दूर करून राहणार. अगोदरच्या सरकारची ७० वर्षे एका बाजूला ठेवा आणि दुसरीकडे मोदी सरकारचे १० वर्ष ठेवा. मोदी सरकारने जेवढे काम महिलांसाठी केले तेवढे कुणीच केलेले नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लखपती दीदी संमेलन आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री शिवराज चौहान, प्रतापराव जाधव, चंद्रशेखर, केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह इतर सर्व खासदार आणि आमदार उपस्थित आहे. भर पावसात हजारोंच्या संख्येने महिला भगिनी उपस्थित आहेत. ३ कोटी महिलांना लखपती बनवण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांतर्गत ५००० कोटी रुपये बँक कर्ज आणि २५०० कोटी रुपये बचत गट सहाय्य निधीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण करण्यात आले. देशभरातील काही लखपती दीदींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्राचे संस्कार भारतात नव्हे जगभरात पसरले
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज लखपती दीदीचे महासंमेलन होत आहे. ६ हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी आज वितरित करण्यात आला. महाराष्ट्रतील बचतगटांना कोटींचा निधी दिला जाणार आहे. महाराष्ट्राचे संस्कार भारतात नव्हे जगभरात पसरले आहे. मी पोलंडला गेलो होतो तिथे पण मला महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाले. तिथल्या राजधानीत कोल्हापूर स्मारक आहे. दुसऱ्या विश्वयुद्धात हजारो माता, भगिनींना कोल्हापूरच्या राजघराण्याने आश्रय दिला होता. त्यांची सेवा केली होती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
जळगाव वारकरी संप्रदायाचे तीर्थ
आमचे जळगाव वारकरी संप्रदायाचे तीर्थ आहे. संत मुक्ताईचीही भूमी आहे. बहिणाबाईची कविता आजही समजला रुढी परंपरेतून बाहेर पडण्यास प्रेरित करते. छत्रपती शिवाजी महाराजांना दिशा देण्याचे काम माता जिजाऊने केले. शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले पुढे आल्या. मातृशक्ती नेहमीच श्रेष्ठ राहिली आहे. महाराष्ट्रातील सर्व बहिणी खूप चांगले काम करीत आहे. तुमच्यात मी राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुलेंची छाप पाहतो. देशातील ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दीष्ट आहे. महाराष्ट्रात १ लाख बहिणी लखपती दीदी झाल्या आहेत, असे मोदी म्हणाले.
महाराष्ट्राला महायुती सारख्या सरकारची आवश्यकता
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार कठोर कायदे करत आहे. अगोदर तक्रार यायची गुन्हे दाखल करणे आणि खटल्याबाबत मात्र भारतीय न्याय संहिता कायद्यात आम्ही अनेक बदल केले आहेत. अल्पवयीन मुला-मुलींसोबत झालेल्या अत्याचारासाठी फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. महिला अत्याचार संदर्भात पाऊले उचलण्यासाठी केंद्र सरकार हे राज्य सरकारसोबत आहे. महाराष्ट्राला महायुती सारख्या सरकारची आवश्यकता आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नेपाळ दुर्घटनेतील भाविकांना श्रद्धांजली
भाषणाला सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळ, काठमांडू येथे बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना श्रद्धांजली अर्पण केली. मृतांना आणि जखमींना मदतीसाठी सरकारने सर्वोतोपरी सहकार्य केले. केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे वायू सेनेच्या विशेष विमानाने मृतदेह घेऊन आल्या. आम्ही सर्व कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मयतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर केली.