भडगाव बस स्थानकात भीषण अपघात; बसचे चाक पायावरून गेल्याने ८० वर्षीय वृद्ध गंभीर जखमी

भडगाव: येथील बस स्थानकात बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका ८० वर्षीय वृद्धाच्या दोन्ही पायांवरून बसचे पुढचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातामुळे बस स्थानक परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाषचंद हुकुमचंद जैन (वय ८०, रा. कजगाव) हे आपल्या गावी जाण्यासाठी भडगाव बस स्थानकावर उभे होते. दरम्यान, स्थानकात दाखल होत असलेल्या ठाणे-पाचोरा (क्र. MH 14 LX 3641) या बसच्या कंडक्टर साईडच्या पुढील चाकाखाली त्यांचे दोन्ही पाय आले. हे चाक पायावरून गेल्याने जैन हे जागीच रक्तबंबाळ झाले आणि गंभीर जखमी झाले.
प्रवाशांची तत्परता आणि उपचार
अपघात घडताच बस स्थानकावरील प्रवाशांनी मोठी गर्दी केली. जखमी जैन यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यासाठी उपस्थित प्रवाशांनी रिक्षा बोलावली. त्याच वेळी सुदैवाने रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यांना तातडीने भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर, जैन यांची प्रकृती आणि जखमांचे गांभीर्य लक्षात घेता, डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ चाळीसगाव येथे हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
पोलीस दप्तरी नोंद नाही
या भीषण अपघाताची माहिती सर्वत्र पसरली असली, तरी सायंकाळपर्यंत भडगाव पोलीस स्टेशनमध्ये या घटनेबाबत कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्याची किंवा अपघाताची अधिकृत नोंद करण्यात आली नव्हती. बस चालकाचा निष्काळजीपणा की अन्य काही कारण, याचा तपास पोलीस चौकशीनंतरच स्पष्ट होऊ शकेल.






