
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । आशिया कप क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात सट्टेबाजाराने थैमान घातले आहे. माहितीनुसार शहरातील २० ते २५ बुकी ऑनलाइन सट्टा घेत असून, हे ‘प्रतिष्ठित’ व्यक्ती असल्याने पोलिस आणि प्रशासनाकडून त्यांना पूर्ण अभय मिळत असल्याची चर्चा आहे. हे बुकी काही पोलिस कर्मचाऱ्यांचे ‘परिचित’ असल्याने कुणीही कारवाई करण्यास धजावत नाही, अशी शहरात चर्चा आहे. हे सगळे कटकारस्थान उघड झाल्यास जळगावात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई होऊ शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिया कपमध्ये क्रिकेटचे रोमांचक सामने सुरू असतानाच, जळगावात सट्टेबाजाराचा काळा बाजार फोफावला आहे. इंडिया-पाकिस्तान सामन्याच्या नावाने लाखोंचा उलाढाल होत असून, हे बुकी आयपीएल स्पर्धेच्या काळातही असाच धंदा करतात. मात्र, आतापर्यंत कोणतीही मोठी कारवाई झालेली नाही. हे कसे शक्य आहे? बुकी शहरातील ‘प्रतिष्ठित’ व्यावसायिक, राजकीय नेते किंवा प्रभावशाली व्यक्ती असल्याने त्यांच्यावर हात टाकण्यास कुणी तयार नाही.
सीडीआर, बँक डिटेल्स उलगडणार गुन्हे
पोलिसांच्या नाकाखाली हा अवैध धंदा जोरात सुरू आहे, तरीही डोळेझाक का? हे शहरातील नागरिकांसाठी मोठा प्रश्न आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हे बुकी काही पोलिस कर्मचाऱ्यांचे जवळचे मित्र आहेत. त्यांच्या सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड) आणि बँक डिटेल्सची तपासणी केली तर सगळे सत्य उघड होईल. लाखोंच्या उलाढालीचे पुरावे मिळतील आणि हे नेटवर्क उध्वस्त होईल. हे बुकी शहरातील प्रायव्हेट क्लब आणि प्रतिष्ठित ठिकाणी बसून हा धंदा चालवतात. हे क्लब म्हणजे सट्टेबाजाराचे ‘सुरक्षित आश्रयस्थान’ बनले आहेत. येथे बसून ते ऑनलाइन अॅप्सद्वारे सट्टा घेतात, पैशांची देवाणघेवाण करतात आणि कुणीही हस्तक्षेप करत नाही.
विशेष पथकाची जिल्ह्याला गरज
जळगावातील हे सट्टेबाजार केवळ क्रिकेटपुरते मर्यादित नाही. आयपीएलमध्येही असाच उन्माद असतो, पण कारवाई शून्य! हे शहरातील युवकांना व्यसनाच्या खाईत ढकलत आहे. लाखोंच्या उलाढालीमुळे अर्थव्यवस्था प्रभावित होत असतानाही प्रशासन झोपले आहे का? हे बुकींचे नेटवर्क उध्वस्त करण्यासाठी तातडीने विशेष पथक नेमण्याची मागणी होत आहे. ड्रग्स आणि क्रिकेट बेटिंग उध्वस्त करायला खमक्या अधिकाऱ्यासह नवख्या तसेच अनुभवी नीडर कर्मचाऱ्यांचे पथक आवश्यक असल्याची चर्चा आहे.






