‘बँकिंग क्षेत्रात गेल्या काही वर्षांत प्रचंड बदल -संजय नागमोती
"आर्थिक सजगता आणि सद्यस्थिती" या विषयावर विद्यापीठात व्याख्यान

‘बँकिंग क्षेत्रात गेल्या काही वर्षांत प्रचंड बदल -संजय नागमोती
“आर्थिक सजगता आणि सद्यस्थिती” या विषयावर विद्यापीठात व्याख्यान
जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागातर्फे आयोजित महाराजा सयाजीराव गायकवाड व्याख्यानमाले अंतर्गत “आर्थिक सजगता आणि सद्यस्थिती” या विषयावर जळगाव जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती यांच्या व्याख्यानाचे आयोजन दि. १९ सप्टेंबर रोजी विद्यापीठातील मुलांचे वसतीगृहातील सभागृहात आयोजन करण्यात आले.
यावेळी मंचावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य ॲड. अमोल पाटील, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, अधिसभा सदस्य भानुदास येवलेकर, रेक्टर तथा अधिसभा सदस्य प्रा. विशाल पराते आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. नागमोती यांनी व्याख्यान देतांना सगितले म्हणाले की, आपले जीवन अर्थपूर्ण करायचे असेल, तर पैशाचा अभाव आणि आतिरीक्त पैशांचा प्रभाव नसावा. विशेषतः तरुणाईसाठी आर्थिक सजगता फार महत्वाची आहे. ‘बँकिंग क्षेत्रात गेल्या काही वर्षांत प्रचंड बदल झाले आहेत. यूपीआय, जनधन योजना, DBT यांसारख्या योजनांमुळे सर्वसामान्यांना थेट फायदा झाला आहे. ते पुढे म्हणाले की, “आजच्या काळात डिजिटल बँकिंगमध्ये आपण जितके अपडेट राहू, तितके व्यवहार करताना दक्षता घेता येते. आपला पासवर्ड कुणालाही सांगू नये. एटीएम कार्ड क्लोन करून फसवणूक होण्याची शक्यता असते. डिजिटल व्यवहार आणि एटीएममधून पैसे काढताना सावधगिरी बाळगावी,’ असे नागमोती यांनी स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांना बँकिंग सेक्टरमध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध असल्याची माहिती दिली. यावेळी प्रश्नोत्तरे झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्रा. अनिल डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील बँकिंग क्षेत्रातील बदलांबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “पुढील दहा वर्षांत बँकिंग क्षेत्रात क्रांतिकारक बदल होणार आहेत. डेस्कटॉप फॅक्टरी आणि सर्टविटाझेशन या नव्या संकल्पना समोर येणार आहेत. यामुळे पुढील काळात बँकेत कॅशियर मिळणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच आर्थिक साक्षरतेकडे लक्ष द्यावे व आपल्या करिअरची दिशा ठरवावी.” प्रास्ताविक अधिसभा सदस्य भानुदास येवलेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कक्षाधिकारी प्रवीण चंदनकर तर आभार प्रदर्शन प्रा. विशाल पराते यांनी केले. यावेळी विद्यापीठाच्या विविध प्रशाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.






