
महा पोलीस न्यूज | दि.२८ एप्रिल २०२५ । जळगाव जिल्ह्यातील तालुकास्तरावर अनधिकृत विक्रेत्यांमार्फत नवीन वाहनांची विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) आणि पोलीस अधिक्षकांनी यावर कारवाई करावी. मोटार वाहन अधिनियम १९८८ व कलम ११२ नुसार पोलिस प्रशासनाने सर्व अनधिकृत शोरूममधील नवीन वाहने तपासून कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन गणेश कौतिकराव ढेंगे यांनी दिले आहे.
जळगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार आणि पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या सूचनेनुसार, कोणत्याही व्यवसाय प्रमाणपत्राशिवाय नवीन वाहनांची विक्री करणे बेकायदेशीर आहे. अधिकृत वाहन वितरकांनी एकाच नावे, एकाच पत्याद्वारे व्यवसाय प्रमाणपत्र (ट्रेड सर्टिफिकेट) घेणे अनिवार्य आहे. परंतु जिल्ह्यात अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
फक्त अधिकृत व्यवसाय प्रमाणपत्र धारक वाहन वितरकांनाच विक्री करण्याची परवानगी असताना जिल्ह्यात अनेक ठिकाणी सब-डीलर्स (Sub-dealers) च्या माध्यमातून वाहनांची विक्री करण्यात येत आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ व कलम ११२ नुसार पोलिस प्रशासनाने सर्व अनधिकृत शोरूममधील नवीन वाहने तपासून कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.