एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा वाद
महा पोलीस न्यूज | २८ मार्च २०२४ | जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना ताजी असताना बुधवारी पुन्हा दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी असे काहीही झाले नसल्याचे सांगितले.
जळगाव शहरातील सर्वात मोठे आणि दमदार कामगिरी असलेले पोलीस ठाणे म्हणून एमआयडीसी पोलीस ठाण्याची ओळख आहे. एमआयडीसी पोलीस ठाणे नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. गेल्याच आठवड्यात एका कर्मचाऱ्याने सट्टा व्यावसायिकाला मारहाण केल्याची घटना घडली होती. हफ्त्याचे पैसे वेळेवर न दिल्याच्या कारणातून ही मारहाण झाल्याचा आरोप सट्टा व्यावसायिकाने केला होता. पोलीस प्रशासनाकडून संबंधित कर्मचाऱ्यावर कोणतीही कार्यवाही न केल्याने त्याला आणखी बळ मिळाले होते.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी दुपारच्या सुमारास दोन कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा वाद झाल्याची माहिती आहे. पोलीस ठाण्यात याबाबत चर्चा असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तेव्हा पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड देखील उपस्थित असल्याचे समजते. सध्या विस्कळीत झालेल्या डीबी पथकातील आणि इतर कर्मचारी याबाबत दबक्या आवाजात चर्चा करीत असून जर हा प्रकार घडला असेल तर सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये नक्कीच कैद झाला असावा.
दरम्यान, चर्चित वादाबाबत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना विचारणा केली असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अवैध धंदे चालकाला केलेली मारहाण आणि आज घडलेल्या प्रकारात दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही न केल्यास इतरांचे आणखी फावले होईल व पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात जिल्हा पोलीस दलात वाद किंवा इतर कारणांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पोलीस अधिक्षकांनी घेतलेले तडकाफडकी निर्णय त्यांची कार्यशैली दाखवून गेले.
सध्या घडलेल्या प्रकारच्या बाबतीत देखील पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी हे योग्य ती चौकशी करून सर्वांना एकच न्याय देतील अशी अपेक्षा पोलीस दल आणि जनतेतून व्यक्त होत आहे.