अमळनेरच्या विकासासाठी स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व आवश्यक : माजी आ.शिरीष चौधरी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर शहरात पारदर्शक, प्रामाणिक आणि जनतेशी जोडलेल्या नेतृत्वाची गरज असल्याचा संदेश माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिला आहे. नगराध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार निवडताना चारित्र्य, अभ्यासू वृत्ती आणि लोकसेवेची जाण या गुणांना प्राधान्य द्यावे, असे ते म्हणाले.
१५ नंबर प्रभागातील रहिवासी असलेले डॉ.परीक्षीत बाविस्कर यांची उमेदवारी जाहीर करताना माजी आमदार चौधरी यांनी त्यांचा अभ्यासू दृष्टिकोन, कुटुंबाची सामाजिक परंपरा आणि शहराशी असलेली नाळ अधोरेखित केली. वैद्यकीय व्यवसायामुळे जरी ते जळगावला स्थायिक झाले असले तरी अमळनेर शहराशी त्यांचे कार्य आणि भावनिक जडणघडण कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रचारादरम्यान काही उमेदवारांविषयी उपस्थित होत असलेल्या आरोपांवर भाष्य करताना, माजी आमदार चौधरी यांनी दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. नगराध्यक्ष पद हे जनसेवेचे केंद्रस्थान असून त्यासाठी स्वच्छ प्रतिमा आणि जबाबदारीची जाण असणाऱ्या उमेदवाराची गरज असल्याचे ते म्हणाले.
शहरातील पर्यायी उमेदवारांबद्दल नागरिकांत निर्माण होत असलेल्या शंका आणि त्यांच्या पूर्वीच्या कामकाजाविषयी उठणाऱ्या चर्चांकडेही त्यांनी लक्ष वेधले. अमळनेरकरांनी २ डिसेंबर रोजी विवेकपूर्ण मतदान करून शहराचा विकास, प्रामाणिकता आणि पारदर्शक प्रशासनाला प्राधान्य द्यावे, असे ते म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री आणि पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेरला आवश्यक निधी आणि नव्या प्रकल्पांची संधी मिळेल, असा विश्वास माजी आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केला.
शहराच्या सार्वजनिक हितासाठी पारदर्शक आणि स्वच्छ कारभार करणारे नेतृत्व हवे असल्याने, डॉ.परीक्षीत बाविस्कर यांना व्यापक जनसमर्थन मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.






