
महा पोलीस न्यूज । विजय माळी । भडगाव तालुक्यातील पुरवठा विभागात रेशन दुकानदार आणि तोतया कर्मचाऱ्यांचे वर्चस्व वाढले असून, शासकीय कामकाजात गंभीर अनियमितता सुरू आहेत, असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी त्वरित चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे. विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर बडतर्फी आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पुरवठा विभाग रेशन दुकानदारांच्या अधिपत्याखाली असून, तोतया कर्मचारी शासकीय शिक्का, बनावट स्वाक्षरी वापरून रेशन कार्ड, आयुष्मान कार्ड आणि इतर शासकीय योजनांच्या लाभांचे वाटप करत आहेत. हे कर्मचारी स्वतः किंवा नातेवाईकांचे रेशन दुकान चालवत असल्याचे उघड होत असल्याचे वाघ यांनी सांगितले.
विभागात स्वतंत्र कार्यालय दिले गेले असून, लाभार्थींची निवड आर्थिक व्यवहारांवर अवलंबून असल्याचा आरोप त्यांनी केला. गरजू व्यक्ती शासकीय लाभापासून वंचित राहत असून, कागदपत्रांमध्ये छेडछाड करून फसवणूक होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
वाघ यांनी सांगितले की, पुरवठा विभागात कार्ड बनवण्याचे रेट ठरले आहेत. रेशन कार्ड ही रहिवासी ओळखीची महत्त्वाची कागदपत्र असली तरी तिच्या माध्यमातून आर्थिक लाभ घेतले जात आहेत. तहसील कार्यालय जवळ असूनही या अनियमिततेची दखल घेतली जात नाही. भविष्यात चुकीच्या कागदपत्रांमुळे अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी कोणाची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तोतया कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, त्यांच्या रेशन दुकानाची परवानगी रद्द व्हावी आणि दिलेल्या कार्डांची चौकशीसाठी समिती नेमावी, अशी मागणी केली आहे.
निवेदन दिल्यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचे सांगत, वाघ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अभय दिले जात असल्याचा आरोप केला. पुरवठा विभागात प्रशासकीय कर्मचारी नेमावेत आणि तोतया कर्मचाऱ्यांना बाजूला करावे, अशीही मागणी त्यांनी केली. या निवेदनावर तीन दिवसांत कारवाई करण्याची सूचना दिली असून, प्रती मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी जळगांव, पुरवठा अधिकारी जळगांव आणि प्रांत अधिकारी पाचोरा यांना पाठवल्या आहेत.






