अमळनेर पोलिसांची तत्परता, १२ तासांत मोटरसायकल चोर ताब्यात

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । अमळनेर पोलिसांनी एका मोटरसायकल चोरीचा अवघ्या १२ तासांत छडा लावत चोरट्याला जेरबंद केले आहे. अरशद अकबर शहा (वय १९, रा. ८० फुटी रोड, भोला बाजार, धुळे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये आणून अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार दि.२२ जुलै रोजी दुपारी १ ते २.३० वाजण्याच्या सुमारास सद्दाम हुसेन (रा.चिकाटे गल्ली, अमळनेर) यांच्या घरासमोरून त्यांची काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH.19.AS.3590 चोरीला गेली होती.
घटनेची तक्रार मिळताच, अमळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तात्काळ दखल घेतली.
गुन्हा नोंदवून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे, विनोद संदानशिव आणि उदय बोरसे यांचा समावेश असलेले एक विशेष पथक तयार केले. या पथकाला मोटरसायकल व चोरट्याचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले. पथकाने तातडीने तपास सुरू केला. त्यांनी मोटरसायकल मालकाशी संपर्क साधून चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यातून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले, ज्यामुळे तपासाची दिशा स्पष्ट झाली.
गोपनीय बातमीदारांना सतर्क करण्यात आले आणि मिळालेल्या माहितीनुसार, पथक तात्काळ धुळे शहराच्या दिशेने रवाना झाले. धुळे शहरातील पांझरा नदीच्या काठी अंजन शाह बाबा दर्ग्याजवळ संशयित आरोपी रात्री उशिरापर्यंत त्याच्या मित्रांसोबत बसलेला असताना, पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने आपले नाव अरशद अकबर शहा (वय १९, रा. ८० फुटी रोड, भोला बाजार, धुळे) असे सांगितले. त्याला अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये आणून अटक करण्यात आली.
न्यायालयाने संशयीत आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीदरम्यान, अरशद शहाकडून चोरी केलेली मोटरसायकल लपवलेल्या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आली.
ही यशस्वी कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वरी रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या आदेश व सूचनांप्रमाणे करण्यात आली. या कारवाईमुळे अमळनेर पोलिसांच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.