रिक्षेत हातचालाकीने पैसे चोरणारी टोळी जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई!

जळगाव: प्रवासी रिक्षामध्ये प्रवाशांना बसवून, त्यांच्या नकळत खिशातील पैसे लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेली रोख रक्कम हस्तगत केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८:०० वाजेच्या सुमारास फिर्यादी हे भुसावळला जाण्यासाठी अजिंठा चौफुली येथे रिक्षेची वाट पाहत उभे होते. यावेळी एका रिक्षाचालकाने त्यांना रिक्षेत बसवले आणि पाठीमागे बसलेल्या दोन पुरुषांच्या मध्यभागी बसण्यास सांगितले. रिक्षा अजिंठा चौफुलीकडून कालिकामाता मंदिराकडे जात असताना, चोरट्यांनी हातचालाकीने फिर्यादीच्या पँटच्या खिशातून २५,००० रुपये रोख काढून घेतले. त्यानंतर टाटा शोरूमसमोर फिर्यादीला उतरवून रिक्षाचालक तिथून पसार झाला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी असा लावला छडा
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाची नियुक्ती केली. या पथकाने शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवली. या तांत्रिक तपासाअंती दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली:
१) प्रद्युम्न उर्फ बंटी नंदू महाले (वय २८, रा. खंडेराव नगर, जळगाव).
२) गौरव उर्फ राज कैलास पाटील (वय १८, रा. खंडेराव नगर, जळगाव).
पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन विश्वासात घेतले असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांच्याकडून चोरीला गेलेली सर्व रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
तपास पथक
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते आणि पोलीस उपअधीक्षक श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहायक पोलीस निरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, किरण पाटील, गणेश ठाकरे आणि राहुल घेटे यांचा समावेश होता. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक महाजन करत आहेत.






