अमली पदार्थविरोधी रॅली आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

महा पोलीस न्यूज । दि.१७ ऑगस्ट २०२५ । जळगाव शहरातील काशीबाई ऊखाजी कोल्हे शाळेच्या विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यासाठी भव्य रॅली काढली होती. या रॅलीत विद्यार्थी, शिक्षक आणि पोलीस प्रशासनाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शाळेपासून शनिपेठ पोलीस ठाण्यापर्यंत काढलेल्या या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी घोषणा देत अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत समाजात संदेश दिला.
रॅलीनंतर शाळेच्या प्रांगणात प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी विद्यार्थिनींना महिलांवरील अत्याचार, कायदेशीर उपाययोजना आणि आत्मसंरक्षणाचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच, टवाळखोर मुलांची माहिती पोलिसांना देण्याचं आवाहनही त्यांनी केले.
पोलीस उपनिरीक्षक श्री.ढिकले यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम, आरोग्य आणि समाजावर होणारे गंभीर परिणाम तसेच कायद्यानुसार असलेल्या शिक्षेची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं. याशिवाय, त्यांनी बालकांचे हक्क आणि संरक्षण यावरही प्रकाश टाकला.
यावेळी नंदकिशोर पाटील, गणेशकुमार नायकर, अल्ताफ पठाण, प्रमोद पाटील, भागवत शिंदे, नवजीत चौधरी, रविंद्र तायडे, गणेश ढाकणे, दिनेश पाटील, प्रतिभा पाटील, वैशाली पावरा, उज्वला पाटोळे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांना बिस्किटे, पाण्याची बाटली आणि केळीचं वाटप केलं. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर जागृती वाढली असून, पालकांनी आणि शिक्षकांनी पोलिसांच्या या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.






