सातपुड्यातील झऱ्यांचे पहिल्यांदाच जिओ-टॅगिंग
१४ वनरक्षकांना प्रशिक्षण; यावल वनविभाग व भूजल सर्वेक्षण यंत्रणेचा संयुक्त उपक्रम

यावल महा पोलीस न्यूज l दि. १५ मे २०२५ l
सातपुडा पर्वतरांगांतील हंगामी आणि बारमाही झऱ्यांची अचूक माहिती नोंदवण्यासाठी यावल (प्रादेशिक) वनविभाग आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, जळगाव यांनी संयुक्तरित्या अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत झऱ्यांचे प्रथमच जिओ-टॅगिंग करण्यात येणार असून, यासाठी १४ वनरक्षकांना एन्ड्रॉइड मोबाईलच्या सहाय्याने माहिती संकलनाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
या उपक्रमामुळे झऱ्यांची स्थानिक पातळीवर अचूक नोंद ठेवता येणार असून, पाणीसाठा वाढवण्यासाठी तसेच पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रशिक्षणादरम्यान भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे सहायक भूवैज्ञानिक सुधीर जैन आणि जीआयएस सहायक महेंद्र बाविस्कर यांनी प्रात्यक्षिकाद्वारे जिओ-टॅगिंगची प्रक्रिया समजावून सांगितली.
या उपक्रमास उपवनसंरक्षक जमीर एम. शेख, सहायक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे (वनीकरण व वन्यजीव, चोपडा) आणि समाधान पाटील (प्रादेशिक व केंम्पा, यावल) यांचे मार्गदर्शन लाभले. यावल व चोपडा वनपरिक्षेत्रातील प्रत्येकी दोन वनरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. थोरात यांचीही उपस्थिती होती.
वनविभागाने या कार्यासाठी आवश्यक वाहने व तांत्रिक साधनसुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. जिओ-टॅगिंगद्वारे मिळणारी माहिती जलसंधारण व वनसंवर्धनाच्या दृष्टीने मोलाची ठरणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.