माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश

माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश
भडगाव (प्रतिनिधी): भडगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तसेच ‘उबाठा’ गटाचे प्रमुख प्रवक्ते गणेश परदेशी यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांनी पक्षप्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
गणेश परदेशी यांनी ठाकरे गटातून बाहेर पडून आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यावेळी आमदार किशोर पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉ. विशाल पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख लखीचंद पाटील, माजी नगरसेवक डॉ. प्रमोद पाटील, निलेश पाटील, देवा अहीरे, जगन भोई, बापूराव पाटील, महेंद्र ततार, रविंद्र पाटील, प्रदीप मालचे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेश परदेशी यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशामुळे ‘उबाठा’ गटाची राजकीय घसरण सुरू झाली असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्या समर्थकांनीही लवकरच शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे भडगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होताना दिसत आहे.