जैन इरिगेशन आणि राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

तिरुचिरापल्ली: केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड आणि राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र (ICAR – NRCB), तिरुचिरापल्ली यांच्यात केळीवरील घातक रोगांवर संशोधन करण्यासाठी नुकताच एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे. यामुळे केळी पिकावरील ‘फ्युजारियम विल्ट’ आणि ‘सीएमव्ही’ (कुकुम्बर मोजेक व्हायरस) यांसारख्या रोगांना आळा घालणे शक्य होणार आहे.
या करारावर राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्वराजन आणि जैन इरिगेशनच्या टिश्यू कल्चर विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. के. बी. पाटील यांनी स्वाक्षरी केली.
यावेळी बोलताना डॉ. सेल्वराजन म्हणाले, “जैन इरिगेशनने गेल्या ३५ वर्षांपासून केळी पिकाच्या विकासासाठी मोलाचे काम केले आहे. त्यांच्या टिश्यू कल्चर तंत्रज्ञानामुळे विषाणूमुक्त रोपे उपलब्ध झाली आहेत, ज्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जळगावासह अनेक जिल्ह्यांत फ्युजारियम विल्ट आणि सीएमव्ही रोगांचे संकट वाढले आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या नुकसानीला सामोरे जात आहेत. यावर उपाय शोधण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर हा करार करण्यात आला आहे.”
या करारामुळे दोन्ही संस्था एकत्र येऊन रोग नियंत्रणाच्या नवीन पद्धती विकसित करणार आहेत. या संशोधनामुळे शेतकऱ्यांना रोगांवर प्रभावी आणि कमी खर्चात उपाययोजना करता येतील. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल आणि उत्पादन वाढून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल. या संशोधन कार्यात शेतकऱ्यांच्या शेतावर देखील प्रयोग केले जाणार आहेत.
यावेळी ऊस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. पी. गोविंदराज आणि जैन इरिगेशनचे डॉ. अनिल पाटील व डॉ. एस. नारायणन उपस्थित होते.






