बनावट आधार कार्डद्वारे भारतात प्रवेश ; भुसावळमध्ये दोन बांगलादेशी महिला ताब्यात

बनावट आधार कार्डद्वारे भारतात प्रवेश ; भुसावळमध्ये दोन बांगलादेशी महिला ताब्यात
भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दोन बांगलादेशी महिलांना देशात अवैधरित्या प्रवेश केल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले आहे. या दोघींना कोणतेही वैध कागदपत्र नव्हते, तसेच त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड आढळून आल्याने पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तानिया अहमद (वय २६) व करीमा अख्तर (वय २२) या बांगलादेशातील महिलांनी रेल्वेमार्गे भारतात प्रवेश केला. भुसावळ रेल्वे स्थानकावर आल्यानंतर त्या शहरातील जामनेर रोडवरील ‘हॉटेल अतिथी’ येथे थांबण्यासाठी गेल्या. हॉटेल व्यवस्थापनाने ओळखपत्र म्हणून आधार कार्ड मागितले असता, त्यांनी झेरॉक्स कॉपी सादर केली. मात्र, मूळ ओळखपत्र सादर करण्यात त्या अपयशी ठरल्याने संशय बळावला.
पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असता, दोघींनी मुंबईतील एका ‘दीदी’कडे कामासाठी जात असल्याचे सांगितले. याआधारे पुढील तपास करताना जलाल आणि सैफुल या दोघांनी बनावट आधार कार्ड तयार करून दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरोधात संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहायक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांकडून महिलांच्या भारतात प्रवेशाच्या उद्देशासंदर्भात सखोल चौकशी केली जात आहे.